राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष मा. हंसराज भैय्या अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचा उत्साह

चांदा ब्लास्ट
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि विद्यमान राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराज भैय्या अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाभरात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी ८ वाजता वढा (ता. चंद्रपूर) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
मंदिर परिसर भक्तीभावाने गजबजून गेला होता. त्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत लाडू वाटपाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता पांढरकवडा येथील पंचमुखी हनुमान मंदिरात पूजा-अर्चा, आरती आणि महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी सरपंच सूरज तोतडे आणि ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणराव वाडगुरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सकाळी १०.३० वाजता नागपूर महामार्गावरील शनी मंदिरात महाआरती आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. या कार्यक्रमांत भाजप महानगरचे जिल्हाध्यक्ष इंजी. सुभाषभाऊ कासनगोट्टूवार, महामंत्री रवींद्र गुरनुले, महामंत्री नामदेवजी डाहुले, ग्रामीण मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, महिला तालुकाध्यक्ष दुर्गा बावणे, पदवीधर नोंदणी प्रमुख सुमित बेले, राकेश पिंपळकर, ममता मोरे, शितल तोटा, युवा मोर्चा अध्यक्ष आशिष वाढाई आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ कासनगोट्टूवार, यांनी भावना व्यक्त करताना सांगितले —
“आमचे नेते हंसराज भैय्या अहिर हे सामान्य कार्यकर्त्यांपासून केंद्रातील महत्त्वाच्या पदापर्यंत पोहोचलेले प्रेरणास्थान आहेत. त्यांनी नेहमीच चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक आणि दूरदर्शी निर्णय घेतले. आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि ते केंद्रीय राजकारणात चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणखी प्रभावी योगदान देत राहोत.”
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी “दीर्घायुष्यमान भवः” अशी प्रार्थना करत मा. हंसराज भैय्या अहिर यांच्या दीर्घायुष्य व आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण जिल्ह्यात या दिवसाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन भाजप महानगरचे महामंत्री नामदेवजी डाहुले यांच्या नेतृत्वात करण्यात आले.



