ताज्या घडामोडी

‘प्रवाशांचा जीव घेण्यासाठी’ एस टी चे नवे ब्रीदवाक्य? – विना लायसन्स बस चालक करतात ड्युटी

राजुरा आगाराचा भोंगळ कारभार - बेजबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य घेऊन मिरविणाऱ्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एस टी महामंडळाचे नवे ब्रीदवाक्य ‘प्रवाशांचा जीव घेण्यासाठी’ करण्यात आले आहे की काय असा प्रश्न राजुरा आगाराच्या कार्यपद्धतीवरून निर्माण झाला असल्याचे चित्र दिसत असुन राजुरा आगारात कुणाचा पायपोस कुणाच्या पायात असे वातावरण तयार झाले आहे. एस टी चा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास अशी आपली सर्वसाधारण धारणा असते मात्र राजुरा आगारातील बेजबदार अधिकाऱ्यांच्या मनमर्जी कारभारामुळे एस टी चा प्रवास म्हणजे प्राणाशी गाठ असेच म्हणावे लागेल.

वास्तविक बघता एस टी विभागाने चालकांसाठी अनेक कठोर नियम ठरवुन दिले आहे. ह्या नियमांचे पालन करून प्रवाशांचा जीव सुरक्षित ठेवण्याची महत्त्वाची  जबाबदारी बस चालकाची असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक वाहन चालकाला प्रवासाच्या वेळी आपले चालक परवाना पत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे मात्र राजुरा आगारातील चालक लायसन्स स्वतःसोबत न घेता लांब पल्ल्याच्या मार्गावर बस चालवत असल्याचा पर्दाफाश पत्रकार आशिष रैच ह्यांनी केला असुन ह्याबद्दल रीतसर तक्रार विभागीय व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी राजुरा आगारातून पुसद पर्यंत बस फेरी सोडण्यात आली. ह्या बस वर मुनीर नामक चालक कर्तव्यावर होता. ह्याच चालकाने पुसद ते राजुरा दरम्यान 5 नोव्हेंबर 2025 रोजी बस परत आणली. प्राप्त झालेल्या माहितीवरून पत्रकाराने बल्लारपूर बस स्थानकावर जाऊन येथिल वाहतुक नियंत्रक गेडाम ह्यांना पुसद बसचे चालक मुनीर ह्यांच्याकडे वाहन चालक परवाना नसल्याचा संशय असल्याने आपण नियमाप्रमाणे संबंधित चालकाचे लायसन्स तपासण्याची विनंती केली मात्र प्रत्यक्षात त्यांनी ह्यासंबंधात कोणतीही कार्यवाही केली नाही.

बल्लारपूर बस स्थानकावर पुसद राजुरा बस क्र. MH40 CM 3767 ही बस पोहचली मात्र चालकाने बस फलाटावर न घेता बस बाजुला लावली त्यावेळी बसचा मार्ग दाखविणारी पाटी पडलेली होती. ह्यामुळे अर्थात बस स्थानकावर असलेल्या प्रवाशांना बस कुठे जाणार आहे ह्याची माहिती मिळू शकणार नव्हती हे विशेष. बस स्थानकावर उभी करण्याचा प्रकार व मार्ग दर्शक पाटी दिसत नसल्याने संबंधित बस चालक व वाहकाला विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला व चालकाला लायसन्स दाखविण्याची विनंती केली असता त्यांनी लायसन्स असल्याचे सांगितले मात्र ते दाखविण्यास टाळाटाळ केल्यामुळे वाहतूक नियंत्रक कक्षाकडे लॉग शिट देण्यास जात असलेल्या चालकासोबत जाऊन वाहतूक नियंत्रकांना पुन्हा एकदा चालकाचे लायसन्स तपासण्याची विनंती केली मात्र त्यांनी अखेरपर्यंत तपासणी केली नाही हे विशेष.

अखेरीस पत्रकाराने चालकाला थेट विचारणा करून घटनेचा व्हिडीओ काढणे सुरू असल्याचे सांगितल्यावर त्याने आपल्याकडे परवाना नसल्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे त्यांच्या मोबाईल मधे सुद्धा लायसन्स चा फोटो नसल्याचे त्याने सांगितले. विना लायसन्स बस का चालवत आहात अशी विचारणा केली असता लायसन्स नूतनीकरणास दिल्याचे सांगितले मात्र त्यासाठी केलेल्या प्रक्रियेचे पुरावे किंवा नूतनीकरण शुल्क भरल्याची पावती सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. चालकाकडे वाहन चालक परवाना नाही हे स्पष्ट झाले असूनही वाहतुक निरीक्षक गेडाम ह्यांनी संबंधित चालकाला प्रवाशांसह बस राजुरा येथे नेण्याचे आदेश दिले. वास्तविक बघता वाहतुक नियंत्रकांनी बस दुसऱ्या बाजुला उभी करून प्रवासी पुढील बस ने राजुरा येथे रवाना करणे व चालकावर कारवाईचा अहवाल देणे गरजेचे असूनही नियंत्रकांनी नियमबाह्य पद्धतीने बस राजुरा मार्गावर रवाना करून नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

ह्यासंदर्भात तत्काळ आगार व्यवस्थापक ह्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून तक्रार केली मात्र त्यांनीही संबंधित बस बल्लारपूर स्थानकावर थांबविण्याच्या सूचना देणे क्रमप्राप्त होते मात्र त्यांनीही ह्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले. संबंधित पत्रकाराने अखेरीस राजुरा आगारात जाऊन वाहतूक निरीक्षक इम्रान शेख व महिला वाहतूक निरीक्षक लाडसे ह्यांना ह्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी असा प्रकार घडणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यांच्या मते त्यांनी चालकांना त्यांचा परवाना नूतनीकरण करून घेण्यास कळविले होते मात्र नियमाप्रमाणे कर्तव्यावर असताना चालकाजवळ लायसन्स होते का असे विचारले असता आम्ही ते तपासत नाही लायसन्स त्यांच्या पेटीत असते असे उडवाउडवीचे उत्तर दिले.

वास्तविक बघता चालक वाहकाला बस देताना त्यांच्याकडे परवाना आहे का हे तपासणे त्यांचे कर्तव्य असूनही त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला तसेच संबंधित चालकाने परवाना नूतनीकरणास दिला असल्याचे कळविले असे सांगितले मात्र नूतनीकरण प्रक्रिया खरेच झाली आहे का तसेच किती काळासाठी नूतनीकरण झाले आहे ह्याची नोंद घेणे आवश्यक असूनही जुना परवाना कालबाह्य होऊन पाच दिवस लोटूनही वाहतूक निरीक्षकांकडे ह्याबद्दल कुठलेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. वाहतूक परवाना नूतनीकरण शुल्क भरल्याचे चालकाने सांगितले आणि वाहतूक निरीक्षकांनी चालकाला राजुरा ते पुसद असा 234 किमी जाण्याचा व तितकाच परत असा एकुण 468 किमी बस वाहतूक करण्याची कामगिरी सोपविली.

वास्तविक बघता संबंधित चालकाचा वाहन परवाना नूतनीकरण झाल्याची खात्री नसताना त्या चालकाला नियमबाह्यपणे इतक्या अंतरावर कामगिरी करण्यास का पाठविण्यात आले ह्याचे समर्पक उत्तर दोन्ही वाहतूक निरीक्षक देऊ शकले नाही केवळ चालकाने प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आणि वाहतूक निरीक्षक ह्यांनी कुठलीही शहानिशा न करता बेजबाबदारपणे कामगिरी सोपविली. मात्र ह्या प्रवासादरम्यान दुर्दैवाने बसचा अपघात घडला असता किंवा इतर काही अप्रिय घटना घडली असती तर प्रवाशांच्या जीवाचा खेळ केल्याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे राजुरा आगारातील बेजबाबदार अधिकारी तसेच बल्लारपूर येथिल वाहतूक नियंत्रक ह्यांना निलंबित करून सखोल चौकशी होणे गरजेचे आहे अन्यथा प्रवाशांचा एस टी महामंडळावरील विश्वास उडेल हे नक्की.

 

विना चालक परवाना कामगिरी देणे शक्य नाही त्यामुळे असा प्रकार घडणार नाही मात्र आपण रीतसर तक्रार दिल्यास आपण चौकशी करून दोषींवर कारवाई करू.

स्मिता सुतवणे

विभागीय व्यवस्थापक

चंद्रपूर विभाग

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये