काँग्रेस–शिवसेना (उ.बा.ठा.) – वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा
गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत महाआघाडीची रणनीती स्पष्ट — राष्ट्रवादी (शरद पवार) गटासाठी दार खुले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आगामी गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत युतीची घोषणा केली आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकजुटीचा निर्धार व्यक्त करत लोकाभिमुख विकासासाठी एकत्र लढण्याचा संकल्प केला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उत्तम पेचे आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार मधुकर चुनारकर यांनी दि. ८ नोव्हेंबर २०२५ ला पत्रकार परिषद घेऊन या युतीची औपचारिक घोषणा केली.
त्यांनी सांगितले की, “जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. गडचांदूर नगरपरिषदेचा सर्वांगीण विकास, युवकांसाठी संधी आणि नागरिकांसाठी सुविधा निर्माण करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.”
नेत्यांनी पुढे स्पष्ट केले की, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटासाठी देखील या आघाडीत प्रवेशाचे दार खुले आहे. “त्यांनी युतीत सामील व्हावे, त्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे,” असे सर्व नेत्यांनी एकमुखाने सांगितले.
या घोषणेमुळे गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. तिन्ही पक्षांच्या एकत्र येण्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपसमोर कठीण आव्हान उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पत्रकार परिषदेला शिवसेना (उ. बा. ठा.) गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उत्तमराव पेचे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार मधुकर चुनारकर, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सागर ठाकूरवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव थिपे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके, काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष महाडोळे, वंचित बहुजन आघाडीचे शहर प्रमुख प्रशिक रामटेके उपस्थित होते.



