ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कापूस आणि सोयाबीन हमीभावाने खरेदीसाठी शासकीय केंद्र तात्काळ सुरू करा – आ. जोरगेवार

मुंबईत आ. जोरगेवार यांनी घेतली पणन मंत्री जयकुमार रावल यांची भेट; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीची मागणी

चांदा ब्लास्ट

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करून त्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने कापूस आणि सोयाबीन खरेदी सुरू करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे. मुंबई येथे आमदार जोरगेवार यांनी मंत्री रावल यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली आणि निवेदनही सादर केले आहे.

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून, बाजारात कापूस आणि सोयाबीनला अत्यल्प दर मिळत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही भरून निघत नाहीत, अशा परिस्थितीत शासनाने तातडीने शासकीय खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी म्हटले.

त्यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख ठिकाणी सीसीआयमार्फत कापूस खरेदी केंद्रे त्वरित सुरू करण्यात यावीत. तसेच सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी स्वतंत्र शासकीय केंद्रे स्थापन करून खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी. या केंद्रांवर शेतकऱ्यांना आवश्यक सर्व सुविधा वजन काटे, गोदाम व्यवस्था, ट्रॉली थांबे, पेमेंटची सुलभ पद्धत इत्यादी व्यवस्था उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

आमदार जोरगेवार म्हणाले, सध्या बाजारात सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा खूप कमी आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने हस्तक्षेप करावा.

या भेटीदरम्यान आमदार जोरगेवार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. मंत्री रावल यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेत तातडीने संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन आमदार जोरगेवार यांना दिले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी हजारो शेतकरी कापूस आणि सोयाबीन उत्पादनावर अवलंबून असतात. परंतु यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे उत्पादन घटले असून बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने हमीभावाने खरेदी सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी म्हटले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये