भद्रावती नगर परिषद निवडणुकीत उमेदवारीसाठी शिवसेनेकडे मोठी गर्दी
नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडे इच्छुकांची मोठी रांग : बाहेरील पक्षांच्या नेत्यांचाही वाढता कल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती नगर परिषद स्थापनेपासूनच शिवसेनेचा प्रभाव कायम राहिला असून यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेनेकडे उमेदवारांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
15 ऑगस्ट 1997 रोजी भद्रावती नगर परिषदेची स्थापना झाली. त्यानंतर 1998 मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचा नगराध्यक्ष नगरपरिषदेवर विराजमान झाला होता. पुढे 2003 ते 2024 या कालावधीत शिवसेनेने नगराध्यक्षपदासह नगरपरिषदेवर भक्कम वर्चस्व राखले.2018 च्या निवडणुकीत तत्कालीन आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आणि नगराध्यक्षपदासह 16 नगरसेवक निवडून आले. मात्र त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान धानोरकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि स्थानिक पातळीवर शिवसेनेत फूट पडून ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागणी झाली.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी वरोरा-भद्रावती मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांना 49,720 मते मिळत त्यांनी दुसरे स्थान पटकावले. त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. त्यांच्या नेतृत्वात 15 नगरसेवकांनी मुंबईत शिंदे गटात औपचारिक प्रवेश केला.आता पुन्हा नगर परिषद निवडणुकीची घोषणा झाल्याने, शिवसेनेत उमेदवारीसाठी चढाओढ तीव्र झाली आहे. दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक सुधीर सातपुते, माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगरसेविका रेखा खुटेमाटे, नकुल शिंदे, माजी नगरसेवक चंद्रकांत खारकर आणि नितीन कवासे यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.
दरम्यान, बाहेरील पक्षांतील अनेक इच्छुक उमेदवारही शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यामुळे अंतिम उमेदवारी कोणाच्या नावावर ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



