मनपा विद्यार्थ्यांचे कलागुण आकाशवाणीवर

चांदा ब्लास्ट
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या पी. एम. श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय (मनपा शाळा) येथील नर्सरी ते चौथीपर्यंतच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी ‘आकाशवाणी’वर झेप घेत, आपली कला आणि सर्जनशीलता संपूर्ण जिल्ह्यासमोर सादर केली आहे.
प्रत्येक रविवारी आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या ‘बालसभा’ या लोकप्रिय कार्यक्रमात या विद्यार्थ्यांनी गाणी, गोष्टी, बोधकथा, नाटिका तसेच स्वच्छतेचा संदेश यांचे मनमोहक सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे एकूण चार भागांमध्ये रेकॉर्डिंग करण्यात आले असून, पहिला भाग आधीच प्रसारित झाला आहे. तर दुसरा भाग रविवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.४० वाजता प्रसारित होणार आहे. उर्वरित दोन भाग १६ नोव्हेंबर आणि २३ नोव्हेंबर रोजी ऐकता येणार आहेत.
आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनःपूर्वक कौतुक केले असून, पालकवर्ग आणि नागरिकांकडूनही शाळेच्या या उपक्रमाचे भरभरून स्वागत होत आहे. या उपक्रमासाठी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त संदीप चीद्रवार,मुख्याध्यापक शिवलाल इरपाते, उमा सुधीर कुकडपवार, अस्मिता खोब्रागडे, स्नेहा गुरपुडे, दर्शना येरणे व संपूर्ण शिक्षकवृंद यांनी मनापासून परिश्रम घेतले.
महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की, “विद्यार्थ्यांच्या मनातील सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी आकाशवाणीसारखे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरते. या माध्यमातून मनपा शाळांचे विद्यार्थी नव्या उंचीवर झेप घेत आहेत.”
डॉ. गायकवाड यांनी शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील काळातही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल, असे सांगितले. हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा नसून, मनपा शिक्षणाच्या दर्जेदारतेचे आणि नवकल्पनांच्या दिशेने घेतलेल्या पावलांचे प्रतिक आहे.



