चंद्रपूर टायगर सफारी प्रकल्पाला दिल्लीहून हिरवा कंदील
आमदार किशोर जोरगेवार यांची दिल्ली येथे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणासोबत सकारात्मक बैठक

चांदा ब्लास्ट
चंद्रपूरच्या मूल रोडवरील वन अकादमी जवळील १७१ हेक्टर क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या टायगर सफारी प्रकल्पाला लवकरच केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळणार असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे. गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांसोबतच्या बैठकीत या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच प्राधिकरणाची अधिकृत बैठक घेऊन मंजुरी देण्यात येईल, असे निश्चित झाले आहे. यामुळे चंद्रपूर टायगर सफारीच्या कामांना गती मिळणार आहे.
दिल्ली येथील केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला भारत सरकारचे सदस्य सचिव डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, महाराष्ट्र राज्य वन्यजीव प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, तसेच एफडीसीएम गोरवाडा प्राणी संग्रहालय लिमिटेड नागपूरचे सीईओ चंद्रशेखर बाला उपस्थित होते.
आमदार किशोर जोरगेवार यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याआधी त्यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा विषय मांडला होता. वनमंत्री नाईक यांनीही प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत निधी वितरण प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर आमदार जोरगेवार यांनी नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाची पाहणी करून प्रकल्पाच्या आराखड्याची माहिती घेतली होती.
चंद्रपूरच्या वन अकादमीच्या जवळ उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेड या संस्थेकडे प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या प्रकल्पात ऑस्ट्रेलियन, साउथ अमेरिकन, साउथ आफ्रिकन आणि इंडियन ट्रेल अशा विविध थीमवर आधारित प्राणीदर्शन झोन असतील. पर्यटकांना येथे कांगारू, जग्वार, माकडे, कॅपीबारा, विविध रंगीबेरंगी पक्षी तसेच देशी आणि विदेशी प्राणी पाहता येणार आहेत.
याशिवाय ४४ हेक्टर क्षेत्रात वाहन सफारी, २० एकर क्षेत्रात चिल्ड्रन पार्क आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
दिल्ली येथे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणासोबत झालेल्या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात मोठी झेप मिळेल. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ताडोबा सफारीसाठी येणाऱ्या लाखो पर्यटकांना टायगर सफारीत वाघाचे हमखास दर्शन घडेल, तसेच विदेशी प्राणी पाहण्याचा नवा अनुभव मिळेल. यामुळे चंद्रपूरची पर्यटन ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होईल आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान लवकरच अधिकृत बैठक घेऊन प्रकल्पाला मंजुरी देण्यात येईल असे सांगितले आहे.
या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील टायगर सफारी प्रकल्पाला नवसंजीवनी मिळणार असून, जिल्हा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
विदर्भातील 10 वाघांचे होणार कोल्हापूर येथे पुनर्वसन – आ. जोरगेवार
चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात गेल्या काही वर्षांपासून मानव–वन्यजीव संघर्षाची समस्या वाढत चालली आहे. वनक्षेत्रातील वाघांची वाढती संख्या, घटणारे अधिवास क्षेत्र आणि मानव वस्त्यांच्या सीमारेषा ओलांडणारे वाघ यामुळे अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर विदर्भातील काही वाघांचे पुनर्वसन करण्याबाबत दिल्ली येथे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी महत्त्वपूर्ण चर्चा केली.
आमदार जोरगेवार यांनी या बैठकीत विदर्भातील वाघांची संख्या आणि वाढता मानव–वन्यजीव संघर्ष याबाबत सविस्तर माहिती सादर केली. त्यानंतर सुमारे १० वाघांचे कोल्हापूर येथील सह्याद्री प्राणी संग्रहालयात पुनर्वसन करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली असून लवकरच त्यास मान्यता देण्यात येणार असल्याचे सांगितले.
आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, चंद्रपूरसह विदर्भात वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यातून मानव–वन्यजीव संघर्ष तीव्र झाला असून अनेक जीवितहानी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर काही वाघांचे नियोजनपूर्वक पुनर्वसन आवश्यक आहे. कोल्हापूर सह्याद्री प्राणी संग्रहालयात १० वाघांचे स्थलांतर केल्यास केवळ संघर्ष कमी होणार नाही, तर या वाघांना योग्य पर्यावरणही मिळेल असे म्हटले आहे.



