वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांना शासनाची मान्यता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ च्यायोजनांना शासनाची मान्यता मिळाली आहे,श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. जीवन राजपूत यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे
महाराष्ट्र शासनाने आज घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार “वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळा” अंतर्गत व्यक्तिगत कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील राजपूत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात नवी दिशा मिळणार आहे.
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. जीवन राजपूत यांनी या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत करताना म्हटले आहे की —
“राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय हा राजपूत समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीचा ऐतिहासिक टप्पा आहे. या महामंडळाच्या माध्यमातून समाजातील युवकांना रोजगार, उद्योग आणि स्वावलंबनाची नवी दिशा मिळेल.”
डॉ. राजपूत यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजित पवार तसेच नियोजन विभागाचे अधिकारी यांचे आभार मानले आहेत.
करणी सेनेच्या वतीने समाजातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी सक्रियपणे कार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.



