ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वढा यात्रा ही श्रद्धेचा उत्सव, सुव्यवस्था राखणे आपले सामूहिक कर्तव्य – आ. जोरगेवार

वढा यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

चांदा ब्लास्ट

दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी विदर्भातील पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वढा येथे भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन आढावा बैठक घेऊन यात्रेच्या नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, तहसीलदार विजय पवार, ग्रामपंचायतीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना सांळुखे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अनिल पेंदोर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनिष कुमार, घुग्घूस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर, लॉंयल मेंटल कंपनीचे क्षेत्रीय महाप्रबंधक तरुण केशवानी, राज्य परिवहन मंडळाचे एटीएस गोमासे, एटीआय नागापूरे, विस्तार अधिकारी मीनाश्री बन्सोडे, ग्रामपंचायत अधिकारी रंजना मुडे, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता सुनील राठोड, धारीवालचे दिनेश गेलेवार, सतीश काकडे, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते नामदेव डाहुले, प्रकाश देवतळे, वढा सरपंच किशोर वराडकर, माजी सरपंच सुनील निखाडे, महेंद्र वडसकर, छोटा नागपूर उपसरपंच ऋषभ दुपारे, राकेश पिंपळकर आदींची उपस्थिती होती.

बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, वढा ही भाविकांची आस्था असलेली पवित्र भूमी आहे. कार्तिक पौर्णिमेला येथे लाखो भाविक येतात. त्यामुळे प्रशासनातील प्रत्येक विभागाने एकत्रितपणे काम करून यात्रा सुयोग्य व शांततेत पार पडेल, असा प्रयत्न करावा.

ते पुढे म्हणाले, यात्रेकरूंच्या सोयीसाठी दहा छोट्या बसेसची व्यवस्था करण्यात यावी. मुख्य मार्गासह वढा येथे जाणाऱ्या सर्व पर्यायी मार्गांची डागडुजी करून त्यांना योग्य बनविण्यात यावे. वाहतूक व्यवस्थेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावावा आणि सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा उभारण्यात यावी. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, मदत केंद्र सुरू करावे, भक्तांसाठी मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, तसेच पावसाची शक्यता लक्षात घेता पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी.

त्यांनी पुढे सांगितले की, नदी घाट परिसरात बॅरिकेटिंग करण्यात यावे, स्वच्छतेसाठी विशेष पथके ठेवावीत, आरोग्य शिबिर लावावे, पार्किंगसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवावी, महिलांसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे स्वतंत्र स्नानगृह तयार करण्यात यावे. प्रत्येक एस.टी. आगारातून यात्रेसाठी विशेष बसेस सोडण्यात याव्यात. विद्युत पुरवठा अखंड ठेवण्यासंबंधी, मोबाईल टॉयलेट्स उभारण्याबाबत, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या.

शेवटी आमदार जोरगेवार म्हणाले, यात्रा ही श्रद्धेचा उत्सव आहे. श्रद्धेसोबत सुव्यवस्था राखणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. प्रत्येक अधिकारी आणि स्वयंसेवकाने जबाबदारीने आपले कार्य पार पाडल्यास वढा यात्रा यंदाही आदर्श ठरेल असे ते म्हणाले. बैठकीला मंदिर कमेटीचे विश्वस्त, यांच्या सह संबधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये