महाविस्तार अँपच्या प्रचारासाठी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची सावली येथे भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेती अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या महाविस्तार एआय अँप प्रचार-प्रसिद्धीसाठी दि 6 फेब्रुवारीला मौजा सावली येथे विशेष भेट देण्यात आली.
चंद्रपूर जिल्हा कृषी अधिक्षक शंकर तोटावार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे तसेच तालुका कृषी अधिकारी ललित राऊत यांनी तालुका सावली येथील लाटेलवार सेतू केंद्राला भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक तोटावार यांनी महाविस्तार एआय अँप महत्त्व, त्यातील सुविधा आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान सहाय्यक कृषी अधिकारी चैताली दुधे व लक्ष्मी ढोंगे यांनी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर महाविस्तार एआय अँप प्रत्यक्ष डाउनलोड करून दिले. अँपमधील हवामान अंदाज, पिक सल्ला, कीड-रोग व्यवस्थापन, बाजारभाव माहिती तसेच मृदा आरोग्याशी संबंधित सुविधा प्रत्यक्ष दाखवून समजावून सांगण्यात आल्या. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अँपचा वापर करण्याची तयारी दर्शवली
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, डिजिटल माध्यमातून शेतकऱ्यांना तात्काळ आणि अचूक माहिती मिळाल्यास शेती निर्णय अधिक शास्त्रीय पद्धतीने घेता येतात व उत्पादनवाढीस मदत होते. शेतकऱ्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर त्यांनी 155313 या क्रमांकावर आपल्या संकेच निरसन करावे. महाविस्तार एआय अँप हे शेतकऱ्यांचे डिजिटल मार्गदर्शक ठरणार असून प्रत्येक शेतकऱ्याने याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
या उपक्रमामुळे सावली तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत जागरूकता वाढत असून डिजिटल शेतीकडे टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.



