बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या गौरवग्रंथ प्रकाशनासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार!
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन केली मागणी
चांदा ब्लास्ट
राहुल नार्वेकर यांनी लवकरच प्रकाशन करण्याचा दिला विश्वास
चंद्रपूर :_ राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी तसेच राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित गौरवग्रंथ प्रकाशित करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम साकारत आहे. आ. श्री. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात २९ ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केली. अध्यक्षांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
समाजकारण, न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांप्रती अखंड निष्ठा ठेवणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्याची मागणी खोबरागडे परिवार आणि जन्मशताब्दी महोत्सव समितीने केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जीवनगौरवग्रंथाच्या प्रकाशनाबाबत निवेदन दिले. या भेटीत आ. मुनगंटीवार यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक योगदानाचे महत्त्व स्पष्ट करत या उपक्रमाचे औचित्य सांगितले. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी या प्रस्तावाचे स्वागत करत गौरवग्रंथाच्या प्रकाशनाबाबत सकारात्मक निर्णय लवकरच घेण्याचे आश्वासन दिले.
गौरवग्रंथात बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या संसदीय कार्याचा ठसा, सामाजिक कार्यातील योगदान, त्यांच्या भाषणांची वैशिष्ट्ये, विचारधारा आणि व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समाविष्ट करण्यात येणार आहेत. समाजाच्या प्रबोधनासाठी आणि नव्या पिढीला मार्गदर्शनासाठी हा ग्रंथ दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या टपाल तिकिटाच्या प्रकाशनासाठी पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच ते तिकीट प्रकाशित झाले होते. आ.मुनगंटीवार यांच्या हस्तेच त्या तिकिटाचे प्रकाशन संपन्न झाले होते, ही बाब उल्लेखनीय असून सामाजिक जाणिव, संवेदनशीलता आणि महान व्यक्तिमत्वांच्या कार्याचा सन्मान राखण्याची वृत्ती असलेले आ. मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून समाजनिष्ठेचा आदर्श दाखवला आहे.
बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या गौरवग्रंथाच्या प्रकाशनामुळे त्यांचे विचार, कार्य आणि प्रेरणा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या आदर्शांनी प्रेरित नव्या पिढीचा प्रगतीचा मार्ग अधिक प्रशस्त होईल, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.



