छटपूजा म्हणजे श्रद्धा, शुद्धता आणि निसर्गाशी जोडणारा उत्सव – आ. किशोर जोरगेवार
एक कोटी रुपयांतून होणार तीन घाटांचा विकास; भूमिपूजन संपन्न

चांदा ब्लास्ट
छटपूजा हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर तो श्रद्धा, शुद्धता आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याचा उत्सव आहे. ही पूजा सूर्यदेव आणि छठी माई यांच्या उपासनेची परंपरा आहे. आज या घाटांच्या विकासाचा शुभारंभ करण्यात आला असून, छटपूजेच्या पवित्र पर्वावर विकासाची ही भेट देताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
छटपूजेच्या निमित्ताने आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील विविध घाटांना भेट देत छठ मय्याचे दर्शन घेतले. यावेळी खनिज निधीतील एक कोटी रुपयांमधून सौंदर्यीकरण करण्यात येणाऱ्या तीन घाटांच्या कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष दशरथ सिंह ठाकूर, महामंत्री श्याम कनकम, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, चंद्रमा यादव, तेजा सिंह, उग्रसेन पांडे, अॅड. परमंहस यादव आदींची उपस्थिती होती. यावेळी पागल बाबा नगर, मेडिकल कॉलेज आणि महाकाली कॉलरी या घाटांच्या सौंदर्यीकरणाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले, आज या पवित्र छटपूजेच्या पर्वावर, आपल्या श्रद्धास्थान असलेल्या झरपट नदी वरील तीनही प्रमुख घाटांच्या सौंदर्यीकरण आणि विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. आपण जेव्हा श्रद्धेचा उत्सव साजरा करतो, तेव्हा त्यात विकासाची जोड दिली, तर त्या उत्सवाला अधिक अर्थ प्राप्त होतो. म्हणूनच, श्रद्धा आणि विकास या दोन्हींचा सुंदर संगम साधण्यासाठी ही कामे हाती घेतली आहेत. पुढील वर्षी जेव्हा आपण पुन्हा छटपूजा साजरी कराल, तेव्हा या घाटांचा परिसर अधिक सुंदर, सुरक्षित आणि स्वच्छ झालेला दिसेल.या तीनही घाटांवर प्रकाशयोजना, बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, सांडपाण्याचा निचरा, तसेच आकर्षक सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. छटपूजेच्या पवित्र पर्वावर सुरू झालेली ही विकासकामे श्रद्धा, स्वच्छता आणि सौंदर्याचा त्रिवेणी संगम ठरतील, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला.



