ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसमध्ये बेफाम वाहतूक — नागरिक त्रस्त

चौक-चौकात पोलिसांचा धाक नाही, सीसीटीव्ही शोपीस ठरले

चांदा ब्लास्ट

घुग्घुस शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. ना वाहतूक पोलिसांचा धाक, ना नियमांचे पालन — वाहनचालक मनमानी पद्धतीने रस्त्यावर वाहने उभी करतात, परिणामी दररोज ट्रॅफिक जॅमची परिस्थिती निर्माण होते. विशेषतः श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि RR चौक येथील वाहतूक व्यवस्था अत्यंत बिकट आहे.

या दोन्ही प्रमुख चौकांवर घुग्घुस पोलिस, लॉयड्स मेटल अँड एनर्जी कंपनी, ब्रिज बांधकाम कंपनी तसेच इतर खासगी व्यावसायिकांनी स्वतःचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र शासनाच्या वतीने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे फक्त शोपीस ठरले आहेत. हे कॅमेरे केवळ अपघातानंतरच ‘अॅक्टिव्ह’ होतात — तोपर्यंत हानी झालेली असते.

वाहतूक पोलिसांची भूमिका प्रश्नचिन्हाखाली

शहरातील वाहतूक पोलिस केवळ जॅम झाल्यानंतरच सक्रिय दिसतात. परंतु बेफाम वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या बाबतीत कोणताही ठोस पाऊल उचलले जात नाही.

सर्वात मोठी समस्या म्हणजे जड वाहनांची — 10 चाकी, 12 चाकी, 14 चाकी, 18 चाकी आणि 22 चाकी ट्रक चालक रस्त्याच्या कडेला मनमानी पद्धतीने वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे, पण त्याचा वापर फक्त कागदोपत्रीच मर्यादित आहे.

स्थानिक नागरिकांची मागणी

स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे की, घुग्घुस पोलिस ठाण्याचे अधिकारी, डीबी पथक आणि वाहतूक विभाग आता या मनमानी वाहनचालकांवर नियंत्रण आणण्यासाठी काय पावले उचलतील? नागरिकांची अपेक्षा आहे की पोलिस विभागाने लवकरात लवकर —

वाहनचालकांची पोलिस पडताळणी,

थकित चलनांची तपासणी,

तसेच कंपन्यांमध्ये जाऊन वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यास सुरुवात करावी.

सध्या सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे — घुग्घुसमधील वाहतूक व्यवस्था पुन्हा सुरळीत होईल का, की ‘सेंसलेस ट्रॅफिक’चा हा सिलसिला असाच सुरू राहील?

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये