अहेतेशाम अली यांची जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड
अनुभवी नेतृत्वामुळे काँग्रेस संघटनास बळकटी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांची दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
ही नियुक्ती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे आणि चंद्रपूर–वणी–आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
अहेतेशाम अली यांनी अलीकडेच नागपूर येथील प्रेस क्लब मध्ये आपल्या असंख्य समर्थकांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. हा पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
यावेळी खा. इमरान प्रतापगढी तसेच खा. प्रतिभाताई धानोरकर प्रमुख उपस्थितीमध्ये होत्या.
अहेतेशाम अली यांचा राजकीय प्रवास काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना एन.एस.यु.आय. अध्यक्षपदापासून सुरू झाला. त्यानंतर ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष, पुढे वरोरा शहर काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
ते माजी पालकमंत्री स्व. संजयबाबू देवतळे यांचे निकटवर्तीय व खंदे सहकारी होते. त्यांच्या सोबत त्यांनी एक काळ भाजपमध्ये प्रवेश केला होता; मात्र आता त्यांनी काँग्रेसच्या विचारसरणीकडे पुनरागमन केले आहे.
सामाजिक आणि लोकाभिमुख कार्यात अहेतेशाम अली यांचे नाव अग्रगण्य राहिले आहे. त्यांनी पूर्वी काँग्रेस संघटन बांधणीसाठी, तसेच जनतेच्या प्रश्नांबाबत जनजागृतीसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.
त्यांचे कार्यकौशल्य आणि संघटनात्मक अनुभव लक्षात घेऊनच जिल्हा काँग्रेस कमिटीने त्यांच्यावर विश्वास टाकत उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, “अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळे काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील संघटन आणखी बळकट होईल,” असा विश्वास जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
अहेतेशाम अली यांच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.