ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्रांतिवीर शहीद वीर बाबुराव शेडमाके समाजाच्या स्वाभिमानाचे आणि आत्मसन्मानाचे प्रतिक आहेत – आ. जोरगेवार

शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रमचे आयोजन.

चांदा ब्लास्ट

शहीद वीर बाबुराव शेडमाके हे नाव उच्चारलं की प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अभिमानाने उर भरून येतो. त्यांनी ब्रिटिश सत्तेचा दहशतवाद सर्वत्र पसरला असताना त्यांनी अत्याचार, शोषण आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. शेडमाके यांनी कोणत्याही भीतीशिवाय आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी झुंज दिली. त्यांचा हा त्याग समाजाच्या स्वाभिमानाचा आणि आत्मसन्मानाचा प्रतिक आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या शहिददिनानिमित्त आज (मंगळवारी) जिल्हा कारागृह परिसरातील त्यांच्या शहिद स्थळी आयोजित स्मरण व आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करत अभिवादन केले. यावेळी पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते प्रकाश देवतळे, भाजपचे अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

आज आपण त्यांच्या शहिद स्थळी उभे आहोत, ही केवळ भावना नाही तर आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. त्यांच्या बलिदानाचं मूल्य शब्दांत मोजता येणार नाही. ते एक विचार होते, ते एक आंदोलन होते, ते आत्मसन्मानाचे प्रतीक होते. समाजात अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी केवळ ताकद नव्हे तर आत्मविश्वास आणि निडरता लागते. शहीद बाबुराव शेडमाके हे त्या निडरतेचं मूर्तिमंत उदाहरण आहेत, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

 आज आपण विकास, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक न्यायाच्या मार्गावर पुढे चाललो आहोत. पण या वाटचालीचा पाया अशा क्रांतीवीरांनीच घातला आहे. त्यामुळे या बलिदानाच्या स्मृती जिवंत ठेवणे, त्यांची प्रेरणा भावी पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे, असे ते यावेळी म्हणाले. आदिवासी समाजाने आता उच्च शिक्षित व्हावे, शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. हा जिल्हा तुमचा आहे, तुम्ही या जिल्ह्याचे मालक आहात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत,असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला समाजबंधूंचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये