शहीद दिनानिमित्त क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन पालकमंत्र्यांसह इतर नेत्यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : वीर शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या पुण्यतिथी निमित्त आज (दि. 21 ऑक्टो.) चंद्रपूर कारागृह परिसरातील पिंपळाच्या शहीद स्मारकाजवळ बाबुराव शेडमाके यांना, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी अभिवादन केले.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, वीर शहीद बाबुराव शेडमाके हे 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक होते. आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आणि गौरवशाली इतिहासाचे त्यांनी नेहमी जतन केले. हीच परंपरा आपल्याला सुद्धा पुढे न्यायची आहे. या शहीद स्मारकाजवळ अतिशय चांगली वास्तू निर्माण झाली पाहिजे. या वास्तू मधून आदिवासी समाजाची संस्कृती आणि गौरवशाली इतिहासाचे प्रदर्शन व्हावे, असा संकल्प करणे गरजेचे आहे. चंद्रपुरात आदिवासी समाजाचे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री डॉ अशोक वुईके यांनी दिली.
यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच ‘अमर रहे, अमर रहे, बाबूराव शेडमाके अमर रहे’ आणि ‘जय सेवा, जय सेवा’ या घोषणांनी परिसर दुमदुमला. तत्पूर्वी उपस्थित सर्वांनी दोन मिनिट उभे राहून शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना श्रद्धांजली अर्पण केली.
21 ऑक्टोबर 1858 रोजी चंद्रपूर कारागृह परिसरात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली बाबुराव शेडमाके यांना फाशी देण्यात आली. बाबुराव शेडमाके यांनी जंगलातील गोंड, कोलाम, परधान व इतर समाजांना एकत्र करून एकजूट निर्माण केली. ‘आपली जमीन, आपले जंगल, आपले स्वराज्य’ ही घोषणा त्यांनी दिली. आजही आदिवासी समाज त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतो.
शहीद पोलिसांनाही अभिवादन : 21 ऑक्टोबर हा दिन पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने जिल्हा पोलीस मुख्यालय येथे शहीद पोलिसांना पालकमंत्री डॉ अशोक वुईके यांनी अभिवादन केले. येथे असलेल्या पोलिस शहीद स्मारकास त्यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.