ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाजाच्या सांस्कृतिक, बौद्धिक उत्थानासाठी साहित्य संमेलन महत्वपूर्ण : कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर

ग्रंथदिंडीने भद्रावतीत साहित्यमय वातावरण : साहित्य संमेलनात साहित्यिक, लेखक, कवी, मान्यवरांची मांदियाळी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

डॉ. ज्ञानेश हटवार लिखित “ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व” या पुस्तकाचे प्रकाशन

     विदर्भ साहित्य संघ नागपूर शाखा भद्रावती द्वारा चंद्रपूर जिल्हा साहित्य संमेलन भद्रावती येथील शिंदे मंगल कार्यालयात संपन्न झाले. या साहित्य संमेलनाला अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ अविनाश आवलगावकर सर यांनी समाजाच्या सांस्कृतिक, बौद्धिक उत्थानासाठी अशा प्रकारचे साहित्य संमेलन महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी केले. त्याचप्रमाणे नव तरुणांनी सामाजिक वास्तवाचे भान ठेवून साहित्य निर्मिती करावी असेही मार्गदर्शन केले.

विदर्भ साहित्य संघ नागपूर शाखा भद्रावती द्वारा आयोजित जिल्हा साहित्य संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा शिंदे मंगल कार्यालय भद्रावती येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष डॉ अविनाश आवलगावकर कुलगुरू, मराठी भाषा विद्यापीठ रिद्धीपुर, उद्घाटक प्रदीप दाते अध्यक्ष, वि. सा. संघ नागपूर, प्रमुख अतिथी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर, डॉ. श्याम मोहरकर ज्येष्ठ साहित्यिक चंद्रपूर, प्रा. बाळासाहेब माने, मुंबई, प्रा. विजयाताई मारोतकर, ज्येष्ठ साहित्यिक, नागपूर, दयारामजी हटवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक, प्रा. डॉ. विठ्ठलराव चौथाले, चामोर्शी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने झाली. ग्रंथ दिंडीचे पूजन कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर सर व प्रदीप दाते सर, डॉ श्याम मोहरकर, प्रा. बाळासाहेब माने व मान्यवरांनी केली. ही ग्रंथदिंडी कार्यालयापासून बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार व तेथून पुन्हा परत कार्यालयात अशी झाली. या ग्रंथ दिंडीत भारतीय देशात कलशधारी तरूणी, लेझीम पथक, शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी, साहित्यिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ग्रंथ दिंडीने भद्रावती येथील वातावरण भारावून गेले.

मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ पूजन करून या साहित्य संमेलनाची सुरुवात झाली.

प्रदीप दाते यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. प्रा डॉ ज्ञानेश हटवार यांनी लिहिलेल्या “ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व” या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी याप्रसंगी साहित्य समाजाचा आरसा आहे, समाजाचे वास्तव रूप साहित्यातून प्रकट व्हावे व साहित्य सेवेतून प्रबोधन व्हावे, असे मत मांडले. साहित्य संमेलनाला मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ श्याम मोहरकर यांनी बोलीभाषा ही हृदयाची भाषा आहे. आपल्याला बोलीभाषा जिवंत ठेवण्यासाठी, आपल्या बोलीतून साहित्य निर्मिती करावी असे प्रतिपादन केले.

प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार लिखित “ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व” या ग्रंथावर भाष्य करतांना हे पुस्तक आजच्या नवीन तरुण पिढीला दिशादर्शक ठरून ग्रामविकासाचे बीज या पुस्तकाच्या रूपाने आपणापर्यंत पोहोचवले आहे, असे मत प्रा. विजयाताई मारोतकर यांनी नोंदविले. प्रा. डॉ विठ्ठल चौथले यांनी या पुस्तकावर भाष्य करतांना डॉ ज्ञानेश हटवार लिखित “ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व” हे पुस्तक वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या पावन पर्वावर प्रकाशित होत आहे, हे विशेष महत्त्वपूर्ण आहे.

आजच्या विदारक परिस्थितीत वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचाराची समाजाला किती आवश्यकता आहे, हे या पुस्तकातून अधोरेखित केलेले आहे. ग्राम राज्य निर्मितीसाठी या विचारांचा अंगीकार समाजाने करावा असेही मार्गदर्शन केले. हे साहित्य संमेलन चार सत्रात संपन्न झाले . या साहित्य संमेलनात उद्घाटन, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, निमंत्रितांचे कवी संमेलन, खुले कवी संमेलन व समारोप असा हा दिवसभर भरगच्च कार्यक्रम चालला.

साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन श्याम हेडाऊ चंद्रपूर यांनी केले, तर आभार प्रदर्शन केशनी ज्ञानेश हटवार यांनी केले.

या साहित्य संमेलनाला विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून लेखक,साहित्यिक, समीक्षक, कवी, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, मराठी भाषेवर प्रेम करणारे रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. सुधीर मोते, अध्यक्ष, सचिव डॉ ज्ञानेश हटवार, उपाध्यक्ष, प्रवीण आडेकर, सहसचिव, अनिल पीट्टलवार, सांस्कृतिक प्रमुख, शालिक दानव, स्वाती गुंडावार, सु वि साठे व वि सा संघ भद्रावतीचे समस्त पदाधिकारी तसेच झाडेबोली साहित्य मंडळ भद्रावतीचे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये