व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी लोणकर केंद्राचे कार्य प्रेरणादायी – आ. जोरगेवार
स्व. गुलाबराव लोणकर प्रतिष्ठान संचालित व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र, हिंगणाळा येथे पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट
स्व. गुलाबराव लोणकर प्रतिष्ठान संचालित लोणकर व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र, हिंगणाळा या केंद्राचा पहिला वर्धापन दिन सोहळा काल रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी या केंद्राचे कार्य हे अत्यंत प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमाला कुसुम लोणकर, मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. किरण देशपांडे, डॉ. पवन मालुसरे, डॉ. अतुल शेंद्रे, भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, सुरेश पचारे, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री रवी गुरनूले यांच्या सह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, व्यसन ही व्यक्तीचे, कुटुंबाचे आणि समाजाचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी साखळी आहे. मात्र, या केंद्राच्या माध्यमातून अनेकांना नवजीवन मिळाले आहे. व्यसनाच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तींना सुसंस्कृत आणि निरोगी जीवनाकडे नेण्याचे प्रामाणिक कार्य हे केंद्र करत असून, ते समाजासाठी अनुकरणीय आहे.
यावेळी त्यांनी या केंद्रातील डॉक्टर, समुपदेशक, स्वयंसेवक तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांचे कौतुक करत म्हटले की, आपण करत असलेले हे कार्य केवळ सेवा नाही, तर ते समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. या कार्यक्रमात व्यसनमुक्त झालेल्या काही व्यक्तींनी आपल्या अनुभवांचे कथन केले. त्यांच्या कथांमधून व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्याचा समाजावर झालेला सकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसून आला.