गोंडवाना विद्यापीठात क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्यासन केंद्राचे उद्घाटन संपन्न
बिरसा मुंडांचा वारसा अधिक दृढ करण्याची गरज - डॉ.संदीप तुंडूरवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भगवान, जननायक आणि क्रांतिवीर अशी संपूर्ण जगताला ओळख असणारे व्यक्तिमत्व म्हणजे बिरसा मुंडा होय. अवघ्या 25 वर्षाच्या आयुष्यात बिरसा मुंडानी राजकीय, सामाजिक,आणि सांस्कृतिक व व्यवस्थापन क्षेत्रात केलेले कार्य गौरवशाली आहे.
जल,जंगल जमीन यावरील लढा इथपर्यंतच बिरसा चे कार्य मर्यादित नव्हते तर शोषण, धर्मांतरण, विस्थापन या विरोधातील त्यांच्या लढ्याने भारतीय स्वातंत्र्याची ज्योत अधिक तीव्रतेने प्रचलित झाली व भारताचे स्वातंत्र्य दृष्टीपथात आले.त्यांचा लढा जनजाती समुदायापर्यंत मर्यादित न राहता तो समस्त भारतीयांचा लढा ठरला.त्यांचे उलगुलान हे महान क्रांतीचे धोतक आहे. भारतीय स्वातंत्र्याला दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य बिरसा मुंडा यांनी केले.
बिरसा मुंडांचा वारसा आजच्या काळात अधिक समयोचित ठरला आहे. वसाहतीक मुक्तीच्या त्यांच्या लढ्यातून शोषण विरोधातील आवाज बळकट होण्याला चालना मिळाली. आज जरी वसाहतीची व्यवस्था नसली तरी शोषण संपलेली नाही. धर्म परिवर्तनाचा प्रश्न आजही संपलेला नाही. पर्यावरणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनत आहे, या पार्श्वभूमीवर बिरसांच्या कार्याचे महत्त्व अधिक जाणवायला लागले असून नव्या पिढीने बिरसा मुंडा चा वारसा अधिक दृढ केला पाहिजे व तो जपला पाहिजे असे प्रतिपादन उद्घाटक व मार्गदर्शक डॉ.संदीप तुंडूरवार, उपप्राचार्य बिंझाणी नगर महाविद्यालय नागपूर,यांनी याप्रसंगी केले.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्यासन केंद्राचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदासजी कामडी होते तर प्रमुख अतिथी म्हणून अध्ययन केंद्राचे प्रस्तावक व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नंदाजी सातपुते,डॉ.विवेक गोरलावार,केंद्राचे समन्वयक डॉ. सत्यनारायण सुदेवाड प्रभूती उपस्थित होते.
यावेळी अध्यासन केंद्राचे प्रस्तावक डॉ. संजय गोरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून बिरसा मुंडा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला व अध्यासन केंद्राच्या विविध कार्यप्रणाली विषयी व उद्देशा विषयी माहिती दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून गुरुदासजी कामडी यांनी बिरसा मुंडा च्या विविध पैलूवर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांनी यातून बोध घ्यावा असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे संचालन केंद्राचे सदस्य डॉ.हेमराज निखाडे तर आभार केंद्राचे समन्वयक डॉ. सत्यनारायण सुदेवाड यांनी मानले. यावेळी बिरसा मुंडा अध्ययन केंद्राचे सदस्य डॉ.राजेंद्र मुद्दमवार, डॉ.प्रिया गेडाम, शक्ती केराम,डॉ. वैभव मसराम, डॉ.नरेश मडावी,प्रा. धनंजय पोशट्टीवार, प्रा. विजय पंधरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळेस सभागृहात श्रोत्यांची उपस्थिती होती.