ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर येथे वर्षावास समारोप व ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उत्साहपूर्ण समारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व सम्यक संबोधी बहुउद्देशीय बौद्ध मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बोरकर नगर, वार्ड क्र. ६ येथील सम्यक संबोधी बुद्ध विहारात वर्षावास समारोप व ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा 10 ऑक्टोबरला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गडचांदूर ही प्राचीन बुद्धभूमी असल्याने, या सोहळ्याने शहरातील बौद्ध समाजात एक वेगळाच उत्साह संचारला होता.

 शहराच्या सीमेवर असलेल्या माणिकगड भागात सम्राट अशोककालीन बरेच बुद्धविहारांचे अवशेष सापडले असून, दरवर्षी ८ जानेवारीला विदर्भातील हजारो बौद्ध अनुयायी इथे भेट देतात. वर्षावास समारोप हा बौद्ध भिक्खूंच्या तीन महिन्यांच्या ध्यान व अभ्यासाचा समारोप करणारा पवित्र कालावधी असल्याने, या सोहळ्याने धम्माचा प्रसार अधिक व्यापक झाला. येथील सम्यक संबोधी बुद्ध विहारात सकाळपासूनच कार्यक्रमाची तयारी सुरू झाली होती. विहार परिसरात रंगीत फुलांच्या सजावटीने सजवण्यात आला असून, पंचशील ध्वज फडकावण्यात आला. धम्मप्रबोधन सत्रात बौद्ध तत्त्वज्ञान, चार आर्य सत्य व अष्टांगिक मार्ग यावर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. सोमाजी गोंडाणे उपस्थित होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात धम्माच्या सम्यक मार्गाचे महत्त्व अधोरेखित केले व बाबासाहेबांच्या शिकवणींचे पालन करण्याचे आवाहन केले.

प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी सर म्हणाले, “बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीने समाजाला जागृत केले असून, आजही हा मार्ग सामाजिक न्यायाची गुरुकिल्ली आहे. नगरसेवक राहुल उमरे, दशरथजी डांगे, प्रा. किर्तीकुमार करमनकर, दिव्यकुमार बोरकर , प्रा. प्रशांत खैरे, कैलास म्हैस्के, मारोतराव लोखंडे,प्रा. माधुरी उके व रवी ताकसांडे यांनी बौद्ध धम्माच्या आधुनिक जीवनातील उपयुक्ततेवर भाष्ये केली. यावेळी विश्वनाथ पाईकराव, बबन सुर्यतळ, मारोती राऊत, शांताबाई अभंगे, अशोक पाटील, प्रभाकर जगताप, मधुकर खाडे, गोमाजी सोनवणे, बाबाराव अभंगे, उत्तम अभंगे व गणेश साखरे उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष बौद्धाचार्य श्रावण जिवणे, नितेश रंगारी व त्यांच्या टीमने अथक प्रयत्न केले. यावेळी सामूहिक भोजनदान झाले.हा सोहळा बौद्ध समाजाच्या एकजुटीचे प्रतीक ठरला असून, गडचांदूरसारख्या छोट्या शहरातही धम्माचा प्रकाश पसरत असल्याचे दिसून आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये