लोकशाहीचा आणि चंद्रपूरकरांचा विजय _ खा. धानोरकर

चांदा ब्लास्ट
“चंद्रपूर शहर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाला मिळालेले हे अभूतपूर्व यश म्हणजे ‘धनशक्ती’ विरुद्ध ‘जनशक्ती’ यांच्यातील लढाईत सर्वसामान्य जनतेने दिलेला ऐतिहासिक कौल आहे. अहंकाराचा पराभव करून चंद्रपूरच्या स्वाभिमानी मतदारांनी लोकशाहीची ताकद दाखवून दिली आहे. हा विजय माझा एकटीचा नसून, प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता आणि शहराच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या तमाम चंद्रपूरकरांचा आहे,” अशी भावना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली.
शहराचा विकास केवळ कागदावर किंवा जाहिरातींमध्ये न राहता तो प्रत्यक्षात जमिनीवर दिसावा, ही जनतेची आर्त हाक आम्ही ऐकली आहे. निवडून आलेले काँग्रेसचे सर्व शिलेदार पूर्ण ताकदीनिशी जनतेच्या सेवेसाठी सज्ज आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेचा कारभार हा अत्यंत पारदर्शक, लोकाभिमुख आणि सामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा असेल, याची ग्वाही त्यांनी या विजयाच्या निमित्ताने दिली. चंद्रपूर शहराला भ्रष्टाचारमुक्त आणि स्वच्छ प्रशासन देणे हेच मुख्य ध्येय असून, विकासाच्या नावाखाली होणारी लूट थांबवून मूलभूत सोयी-सुविधांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाईल.
या महाविजयासाठी काँग्रेस पक्ष एकसंघ म्हणून लढला. यामध्ये काँग्रेसचे विधानसभा गटनेते आ. विजय वडेट्टीवार, आ. सुधाकर अडबाले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाष धोटे, ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेणेकर आणि चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे यांचे विशेष योगदान व मार्गदर्शन लाभले. आगामी काळात आम्ही सर्वजण मिळून ‘स्वच्छ, सुंदर आणि सुसंस्कृत चंद्रपूर’ घडवण्यासाठी वचनबद्ध आहोत, असा निर्धारही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला.



