जिल्हाधिकाऱ्याकडून महिला व बालविकास विभागाचा आढावा

चांदा ब्लास्ट
जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. १०) आढावा घेतला. यात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे कामकाज, ‘पोश ॲक्ट – २०१३’, ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर नोंदणी, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना आणि आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह योजनांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे, माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे, संरक्षण अधिकारी कविता राठोड, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तारवार, आतिश चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, प्रत्येक शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये महिलांसाठी अंतर्गत् तक्रार समिती स्थापन करावी. तसेच ती वेळोवेळी अपडेटसुध्दा करावी. ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर नोंदणीबाबत महिला व बालविकास विभागाने सर्वांसाठी प्रशिक्षण आयोजित करावे. विविध विभागामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणा-या योजना, त्यांना मिळणारे अनुदान आदी बाबी गांभिर्याने कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.
याप्रसंगी कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे, समुदेशन केंद्र, जिल्हा विधीसेवा अंतर्गत मनोधैर्य योजना, कायदेविषयक सल्ला व जनजागृती कार्यक्रम, सखी वन स्टॉप सेंटर, जिजामाता वर्किंग वुमेन होस्टेल, शक्तीसदन योजना, स्वाधार, सर्व शासकीय आस्थापनेवर अंतर्गत तक्रार समितीचे गठन, ‘शी –बॉक्स’ पोर्टलवर नोंदणी, बेटी बचाव, बेटी पढाओ, विविध योजनांमध्ये आलेले अनुदान आदींचा आढावा घेण्यात आला.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी सादरीकरण केले. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.