ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत बुद्धमूर्ती तुटलेल्या अवस्थेत आढळली

समाजबांधवांचा संताप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         शहरातील एका शेतात आज सकाळी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती तुटलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. ही घटना समजताच बौद्ध समाज बांधवांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली.

या घटनेची माहिती सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचे माजी नगरसेवक सुशील देवगडे यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर बौद्ध समाज संघटनचे मुख्य समन्वयक डॉ. अमित नगराळे, भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष राजरतन पेटकर आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर यांनी घटनास्थळी जाऊन हा मुद्दा उपस्थित केला.

सदर शेतात ऑगस्ट २०१४ मध्ये उत्खननादरम्यान बुद्धमूर्ती मिळाल्याची घटना घडली होती. त्या वेळी ती मूर्ती समाजबांधवांतर्फे विंजासन टेकडी येथे नेऊन ठेवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा सर्वे नंबर ७४,७५,२५५,२५६ येथे त्याच ठिकाणी शेतीचे खोदकाम सुरू केले असून, मिळालेल्या मूर्तीबाबत प्रशासनाला कोणतीही माहिती न देता काम सुरू ठेवल्याचा आरोप समाज बांधवांनी केला आहे.

या प्रकरणी शेतमालकावर ऐतिहासिक धरोहर नष्ट केल्याबद्दल तसेच शहरात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी प्रशासनाकडे केली आहे.

         मुर्ती मिळाल्यानंतर शेतमालकांनी प्रशासनाला कोणतीही सूचना न देता मूर्ती मिळाल्याच्या ठिकाणापासून अंदाजे ६० ते ७० फूट दूर झाडा-झुडपात फेकून दिली. मुर्तीचा एक हात तुटलेला आहे. मुर्ती डोक्यापासून वेगळी झाली आहे. मुर्तीवर जेसीबीचे घाव आहेत. या जागेवर उत्खननासाठी सरकारने कोणतीही परवानगी देऊ नये. यासाठी तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. तहसीलदारांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करण्याकरिता आज रात्रीपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. अन्यथा उद्या समाजाच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्यात येईल.

        कुशल मेश्राम,राज्य सदस्य, वंचित बहुजन आघाडी

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये