ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रा. प्रशांत खैरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर : सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथील प्राध्यापक, कवी आणि आंबेडकरी विचारवंत प्रा. प्रशांत खैरे यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, नवी दिल्ली अंतर्गत प्रोटॉन (PROTAN – Professor, Teacher and Non-Training) च्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंजपेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला मा. वामन मेश्राम (राष्ट्रीय अध्यक्ष, मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, नवी दिल्ली) यांच्या अध्यक्षतेखाली मा. विक्रम काळे (शिक्षक आमदार, औरंगाबाद), मा. किरण राव सरनाईक (शिक्षक आमदार, अमरावती), प्रा. डॉ. व्ही. डी. मोरे (उपसंचालक, उच्च शिक्षण संचनालय, महाराष्ट्र, पुणे) आणि मा. राजेंद्र आंधळे (राज्य समन्वयक, म. रा. माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ, पुणे) यांची प्रमुख उपस्थिती असेल.

प्रा. प्रशांत खैरे सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात कनिष्ठ व्याख्याता म्हणून कार्यरत असून, ते सामाजिक, परिवर्तनवादी, वास्तववादी आणि विद्रोही कवी म्हणून सुपरिचित आहेत. आपल्या कविता आणि गीतांद्वारे शिव, फुले, शाहू आणि आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे कार्य ते अविरतपणे करत आहेत. त्यांच्या “मला श्वास घेता येत नाही” या काव्यसंग्रहाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. शेतकरी आत्महत्या, भारतीय संविधान आणि स्त्रीभ्रूणहत्या यासारख्या सामाजिक विषयांवर त्यांनी नाट्यलेखन केले असून, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या नाटकांचे गावागावात प्रयोग सादर करून समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

प्रा. खैरे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. आनंदरावजी अडबाले, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे, सर्व कर्मचारीवृंद, आजी-माजी विद्यार्थी तसेच परिसरातील शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये