पेंढरी मक्ता येथील अतिक्रमणधारकांना घराचे पट्टे द्या
निवेदनाद्वारे मागणी करीत आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील शासकीय जागेवर अनेक वर्षांपासून घरे बांधून वहीवाट करीत असलेल्या कुटुंबाना जमीनीचे पट्टे नसल्याने घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे पट्टे देण्याची मागणी वहीवाटधारांनी केली असून पट्टे न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला.
सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथे शासकीय जागेत वडहेटी नावाची टोली असून अनेक वर्षांपासून तिथे जवळपास साठ कुटुंब वस्ती करीत आहेत. त्या वस्तीत रस्ते, नाल्या,हातपम्प,पाण्याची सुविधा व पूर्ण विजेची सोय झालेली आहे. जवळपास ९० टक्के कुटुंबाना शासकीय घरकुल झालेले आहे. सर्व सुरळीत असतांना अचानक सन २०२२-२३ मध्ये ग्रामपंचायत गाव नमुना ८ रेकॉर्डला शासकीय जागा असल्याचा शेरा दर्शविण्यात आला आहे.
त्यामुळे येथील कुटुंबाना पट्ट्याअभावी घरकुल मंजूर होऊनही घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. पट्टे मिळावे यासाठी ग्रामपंचायतकडून पंचायत समिती व तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल केला आहे मात्र अजूनही पट्ट्याबाबत कारवाई होत नसल्याने अतिक्रमणधारक तहसील कार्यालयात पोहचले व पट्ट्याची मागणी केली. यावेळी नायब तहसीलदार मडावी यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करून उपविभागीय अधिकारी यांचेकडे प्रस्ताव दाखल करण्याचे आश्वासन दिले. पट्टे न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार, ग्रामपंचायत सदस्या अंजुताई बोरेवार, सदस्य वैभव कोरगंदावार, नगरसेवक प्रितम गेडाम, नगरसेवक नितेश रस्से, श्रीकांत बहिरवार, दिवाकर मडावी, प्रविण गेडाम, सुनिल ढोले, महादेव गेडाम, उषा कोवे, रेखा मडावी, नीता कोल्हे आदीसह अनेक अतिक्रमणधारक उपस्थित होते.