जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लखमापूर येथे ‘विद्यार्थी पॉवर पास’ उपक्रमासह स्वच्छतेचा शिवोत्सव साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान ‘स्वच्छतेचा शिवोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमाचे नेतृत्व शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनोद क्षीरसागर यांनी केले. ग्रामपंचायत लखमापूरचे सरपंच श्री. अरुण जुमनाके यांच्या सहकार्याने शाळेस विविध स्वच्छता उपकरणे पुरवण्यात आली. यामध्ये झाडू, डस्टबिन्स, हातमोजे, मास्क व इतर साहित्याचा समावेश होता.
शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिम, जनजागृती रॅली, चित्रकला व निबंध स्पर्धा, घोषवाक्य लेखन, आणि गावात जनजागृती कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. विशेष म्हणजे, प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या सहभागाची नोंद करणारा ‘विद्यार्थी पॉवर पास’ देण्यात आला. या पासमध्ये त्यांच्या योगदानाची माहिती, शिक्षकांचे अभिप्राय आणि विशेष ओळख नमूद करण्यात आली.
उपक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट सहभाग करणाऱ्या विद्यार्थ्यांना “स्वच्छता वीर” प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शाळेच्या नोटिस बोर्डवर पॉवर पासचे प्रदर्शनही करण्यात आले.
शाळा व ग्रामपंचायतीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे लखमापूर गावात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.