ताज्या घडामोडी

भाजपाने केली राजुरा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी – माजी आ. ॲड वामनराव चटप ह्यांचा गंभीर आरोप

एस आय टी स्थापन करून सखोल चौकशीची मागणी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

                  चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले असून यात भाजपाचा हात असल्याचा स्पष्ट आरोप शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केला आहे. यासंदर्भात यापूर्वी राजुरा पोलिस ठाण्यात नोंदविलेला एफआयआर आणि ऑनलाईन नोंदणीसाठी उपयोगात आणलेला मोबाईल क्रमांक भाजप कार्यकर्त्यांचे असून या प्रकरणी कर्नाटक राज्यांप्रमाणे महाराष्ट्र एसआयटी नेमून कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. काॅग्रेस नेते राहूल गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवर राजुरा येथील मतचोरीचा मुद्दा उचलल्यानंतर आता सर्व थरातून या बनावट मतांचा मुद्दा गाजत आहे. दरम्यान माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी चंद्रपूर जिल्हा पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांना दिनांक ३ आक्टोंंबर २०२५ रोजी पत्र पाठवून हा मुद्दा अधोरेखीत करतांना भाजप वर गंभीर आरोप करीत मोबाईल क्रमांक व त्यांची नावे आदी पुरावे असतांनाही कारवाई केली नसल्याचे प्रकर्षाने मांडले आहे.
                भारतीय जनता पक्षाने बनावट मते नोंदविण्यासाठी तंत्रज्ञानाचा पध्दतशीर वापर केला आहे. राजुरा येथे एकुण ६,८५३ बनावट मतांची नोंद झाल्याचे निदर्शनास आले. याची माहिती मिळताच राजकिय पक्षांनी निवडणूक आयोग व प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर तहसिलदार ओमप्रकाश गोंड यांनी दिनांक १९ आक्टोंंबर २०२४ रोजी राजुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून सविस्तर माहिती दिली. त्यानंतर अंदाजे २० अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला. मात्र त्यानंतर एक वर्षापासून कसलीही कारवाई झाली नाही.
                   तक्रारीनुसार ऑनलाईन नोंदणी झालेल्या बनावट मतांसाठी वापरण्यात आलेला मोबाईल क्रमांक भाजप कार्यकर्ते अथवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींचे आहे. तक्रारीत १५ व्या क्रमांकावरील मोबाईल क्रमांक हा अनिल झाडे यांचा असून ते भाजपचे नेते निलेश ताजणे यांचे संबंधित आहेत. १६ व्या क्रमांकावर असलेला मोबाईल क्रमांक प्रतिक सदानपवार यांचा असून ते गडचांदूर येथील भाजप कार्यकर्ते असून त्याचे भाजपचे जेष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार देवराव भोंगळे यांचेसोबतचे छायाचित्र उपलब्ध आहेत. याशिवाय गंगाधर, बंडू व क्रिश यांचे मोबाईल क्रमांक दर्शवित असून ते कोरपना तालुक्यातील बाखर्डी परिसरातील भाजप कार्यकर्ते आहेत.
                   पोलिसांकडे तक्रार असतांना त्याचा मागोवा घेऊन कारवाई करण्याचे सोडून निवडणूक आयोगाकडे ढकलली आहे. यामुळे राजुरा मतदारसंघात मतांच्या खोट्या नोंदी घेऊन निकाल प्रभावित करण्याचा थेट प्रयत्न झाला आहे. निवडणूक आयोगावर जबाबदारी ढकलण्याच्या कृतीवर ॲड. चटप यांनी तीव्र विरोध करीत पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करून चौकशी करावी आणि या बनावट मतदार नोंदणीतील मुख्य सूत्रधार समोर आणावा तसेच कार्यवाहीचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केली आहे.
                   यासंदर्भात पोलिस विभागाने कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते ॲड. मुरलीधर देवाळकर, शे.सं.युवा आघाडी अध्यक्ष ॲड. दिपक चटप, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी जि.प. समाजकल्याण सभापती निळकंठ कोरांगे, महिला आघाडी अध्यक्ष माजी जि.प.सदस्य पोर्णिमा निरांजने यांनी दिला आहे.
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये