नारड्यात खोदकामात आढळले जुने कोरीव पाषान
भवानी मंदिराच्या जीर्णोद्धार कामात उलगडले पुरातन अवशेष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना तालुक्यातील नारडा गावात असलेल्या भवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना शुक्रवारी (दि. ३) पायव्याचे खोदकाम करताना जुने कोरीव पाषाण सापडले. या घटनेने गावकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी या पाषाणाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली.
नारडा येथील भवानी माता मंदिर हे अत्यंत प्राचीन असल्याचे मानले जाते. पूर्वीचे मंदिर कालांतराने पडल्यामुळे काही वर्षांपूर्वी नवे मंदिर बांधण्यात आले होते. त्यावेळी जुन्या मूर्ती खंडित झाल्याने नव्या मूर्ती प्रतिष्ठापित करून मंदिराचे नव्याने जीर्णोद्धार करण्यात आले होते. आता मंदिर पुन्हा जीर्ण झाल्याने गावकऱ्यांच्या पुढाकाराने आणि भाविकांच्या सहयोगातून भव्य मंदिर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
याच कामाचा भाग म्हणून शुक्रवार रोजी पायव्याचे खोदकाम सुरू असताना भूमीत दबलेले पाच कोरीव पाषाण सापडले. स्थानिक चर्चेनुसार हे पाषाण जुन्या मंदिराचा अवशेष असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून पाषाण पाहण्यासाठी दिवसभर लोकांची गर्दी उसळली.
स्थानिक पातळीवर या पाषाणाचा अभ्यास व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.