महाकाली महोत्सव भक्ती, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा लोकउत्सव – आ. जोरगेवार
महाप्रसाद कार्यक्रमाने पाच दिवसीय महोत्सवाचा समारोप, सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची महोत्सवाला भेट

चांदा ब्लास्ट
श्री माता महाकाली महोत्सव केवळ भक्तीचा उत्सव नसून लोकउत्सव आहे. समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक धर्म, प्रत्येक जात या महोत्सवात सहभागी होते. ही एकता म्हणजेच आपल्या संस्कृतीचे सामर्थ्य आहे. महाकाली महोत्सवाच्या माध्यमातून आपले धार्मिक महत्त्व देशपातळीवर पोहोचविण्याचे कार्य आपण करत असून यात चंद्रपूरकरांची मिळत असलेली साथ उत्साहवर्धक आहे. हा महोत्सव म्हणजे भक्ती, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा लोकउत्सव असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आयोजित पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचा बुधवारी नवदाम्पत्य यांच्या हस्ते यज्ञ आणि महाप्रसादाने समारोप करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमात महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. यावेळी महोत्सवात सेवा देणाऱ्या सर्व समाज आणि सेवकांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, या पाच दिवसांत आपण कन्यापूजन, नवदाम्पत्यांच्या हस्ते होमहवन, सुहासिनींना सौभाग्याचा चुडा, ज्येष्ठ मायमाऊलींचा सन्मान, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम, समाजजागृती उपक्रम, महिला सक्षमीकरण, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम अशा असंख्य उपक्रम घेण्यात आले. हे सर्व उपक्रम फक्त धार्मिक कर्तव्य नसून, ते आपल्या समाजजीवनात संस्कार रुजवणारे दीपस्तंभ आहेत.
नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्यात भक्तांचा महासागर पालखी यात्रेत उफाळून आला. शहरातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली माता भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. संपूर्ण चंद्रपूर या दिवसांत भक्तिरसाने ओतप्रोत भरून गेले. महोत्सवामुळे चंद्रपूरची कीर्ती दूरवर पोहोचली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही चंद्रपूरचे महत्त्व वाढत असून, आपल्या शहराचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि भक्तिभावाची परंपरा जगासमोर पोहोचत आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी असंख्य संस्था, स्वयंसेवक, कलाकार, महिला मंडळे, महोत्सव समितीचे पदाधिकारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या या सेवेला मी वंदन करतो. त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या महोत्सवाचा सन्मान असल्याचे ते यावेळी म्हणाले.
चंद्रपूर हे इतिहासाचा, संस्कृतीचा आणि श्रद्धेचा ठेवा आहे. गोंडवाना साम्राज्याची ही राजधानी, ‘काळ्या सोन्या’चे भांडार असलेल्या या भूमीला ताडोबाच्या व्याघ्र प्रकल्पाने आंतरराष्ट्रीय पातळीवर मान मिळवून दिला आहे. माता महाकालीच्या मंदिराला वर्षानुवर्षे भाविक येथे येतात, त्यामुळेच हा महोत्सव केवळ उत्सव नसून भक्तीचा दीपोत्सव असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यावेळी महोत्सव समितीचे उपाध्यक्ष अॅड. विजय मोगरे, सुनील महाकाले, सचिव अजय जयस्वाल, सहसचिव बलराम डोडाणी, कोषाध्यक्ष पवन सराफ, सहकोषाध्यक्ष राजेश शास्त्रकार, विश्वस्त मिलिंद गंपावार, प्रभाकर मंत्री, जयश्री कापसे–गावंडे, वंदना हातगावकर, आशा महाकाले, सविता दंडारे आदींची उपस्थिती होती.
श्याम धोपटे, मुक्ता बोझावार, एकता पित्तूलवार, अलका ठाकरे, सुमेधा श्रीरामे, राजश्री मार्कंडेवार, रजनी पॉल, श्रद्धा एडलावार, भारती कोटकर, सरोज चांदेकर, प्रज्ञा जीवनकर, धनंजय तावडे, सुरक्षणा गायवकवाड यांनी पाच दिवस संचालनाची व्यवस्था सांभाळली. तर आरती संचामध्ये मनीषा पडगीलवार, राज ताटपल्लीवार, सार्थक उत्तरवार, मैथील कुंभरे, सुचिता पद्मावार, रिद्धी राऊत आदींची उपस्थिती राहिली. ज्येष्ठ नागरिक संघ, गायत्री परिवार, निर्मला माता सहज योग ध्यान साधना केंद्र यांच्या सहकार्याने अनेक कार्यक्रम झाले. मंच व्यवस्था डॉ. आम्रपाली देवगडे, अतिथी गडकरी, प्रीती बिंद यांनी सांभाळली.
सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी महोत्सव स्थळी
महोत्सवाच्या चौथ्या दिवशी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी महाकाली महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते मातेची महाआरती करण्यात आली. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नियोजनबद्ध आयोजन आणि विविध सामाजिक उपक्रम याबद्दल सोनाली कुलकर्णी यांनी आयोजनाचे कौतुक केले.