जिल्ह्यातील १९१ गावांमध्ये ‘आदिसेवा केंद्र’ स्थापन

चांदा ब्लास्ट
भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाच्यावतीने सुरू करण्यात आलेले ‘आदि कर्मयोगी अभियान’ अंतर्गत प्रत्येक आदिवासी गावात एक आदिसेवा केंद्र स्थापन करणे, हे या अभियानाचे एक महत्त्वाचे अंग आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात १९१ गावांमध्ये ‘आदिसेवा केंद्र’ स्थापन करण्यात आले आहेत.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आदिसेवा पर्व राबविण्यात आले. या अंतर्गत् आदिवासी बहुल गावांमध्ये ‘ग्राम व्हिजन -२०३०’ आराखडे तयार करण्याचे, प्रशासन व नागरिक यांना अधिक जवळ आणण्याचे आणि सेवा वितरणातील तफावत कमी करण्याचे एक पाऊल आहे. या केंद्रांमध्ये विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज-निवेदने स्वीकारणे, नागरिकांच्या तक्रारी ऐकणे तसेच त्या तक्रारी पुढील कार्यवाहीस पाठविण्याचे काम होणार आहे. आदिसेवा केंद्र हे ‘एक खिडकी योजनेप्रमाणे’ कार्य करणारे केंद्र असतील. जिथे नागरिकांना विविध सेवा मिळू शकतील. जसे की दस्तऐवज वितरण व सुविधा. या केंद्रातून शासकीय योजनांचा लाभ गावोगावी पुरविला जाणार आहे.
जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकित सिंग व प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आणि तालुका गट विकास अधिकारी यांच्या समन्वयातून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १९१ गावांमध्ये सेवा पर्व राबविण्यात आले. या गावांमध्ये आदिसेवा केंद्र स्थापन करण्यात आले असून दर मंगळवारी संबंधित विभागांचे अधिकारी सेवा केंद्रांमध्ये उपस्थित राहतील. या केंद्रांमध्ये आदिवासी नागरिक त्यांच्या अडचणी, सूचना व मागण्या मांडतील. अर्ज-निवेदने तपासली जातील व पुढील कार्यवाहीस पाठविली जाईल.
सेवापर्वात घेण्यात आलेले उपक्रम: ग्राम फेरी, शिवार फेरी व जंगल फेरी, निवडलेल्या १९१ गावांमध्ये गाव, शिवार फेरी करण्यात आल्या असून त्याद्वारे स्थानिक समस्या समजून घेण्यात आल्या. त्या व्हिलेज वर्कबुक मध्ये नमूद करून आणि त्यावर उपाय निश्चित करून ते ग्राम कृती आराखड्यामध्ये सामील करण्यात आले आहेत.
ग्राम कृती आराखडे : गावातील समस्या व प्रस्तावित सुधारणा यांचे १९१ आराखडे ग्रामस्थ व शासकीय यंत्रणांच्या समन्वयाने तयार करण्यात येत आहेत. यातील बहुतांशी आराखडे पूर्ण झाले आहेत. या ग्रामकृती आराखड्यांना १ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर, २०२५ या दरम्यान होणाऱ्या विशेष ग्रामसंभामध्ये ठरावाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येणार आहे.
अभिसरण पध्दतीने योजना अंमलबजावणी : ग्राम कृती आराखड्यांमध्ये सुचविलेली कामे विविध विभागांच्या योजनांमधून पूर्ण करणे. ठरावाने नोंदलेली कामे आणि नव्या प्रस्तावांचे केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणे व निधी मागणी करणे. आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जनधन खाते, इतर प्रमाणपत्रे गावोगावी वितरित करणे.
अपेक्षित परिणाम व महत्त्व : आदिवासी भागात शासन-सेवा पोहोचेल, नागरिकांचा विश्वास वाढेल. ग्रामपातळीवर “व्हिजन २०३०” आराखडा तयार होऊन स्थानिकदृष्ट्या विकास कार्य होतील.
तक्रारी व अडचणी त्वरित समजून घेऊन निराकरणाची प्रक्रिया गतीशीर होईल. ‘आदि साथी’ म्हणजेच आदिवासी समाजातून प्रेरित नेतृत्व तयार होईल. विविध शासकीय विभागांतील योजनांचा लाभ तिथे तिथे मिळवून देणे, सेवा वितरणातील तफावत कमी करणे. राज्य व केंद्राच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळेल.
अभियानात सहभागी होणारे कर्मयोगी, आदि सहयोगी, आदि साथी (स्वयंसेवक, आदिवासी नेतृत्त्व) हे सामाजिक बदलाचे वाहक बनतील.