MPSC उमेदवारांच्या सहनशीलतेचा अंत!
'रोजगार मेळाव्या'च्या अट्टहासाने लिपिक-टंकलेखक उमेदवारांची नियुक्ती अडीच वर्षांपासून रखडली ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार प्रतिभा धानोरकर यांचे थेट पत्र

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या गट-क (लिपिक व टंकलेखक) परीक्षा २०२३ मध्ये निवड झालेल्या अनेक उमेदवारांना नियुक्तीसाठी अडीच वर्षांहून अधिक काळ वाट पाहावी लागत आहे. भरती प्रक्रियेचा अंतिम टप्पा पूर्ण होऊनही, शासनाच्या ‘रोजगार मेळाव्या’च्या धोरणामुळे नियुक्तीपत्रे अडकून पडल्याने तरुण उमेदवारांमध्ये तीव्र निराशा पसरली आहे. या गंभीर दिरंगाईबद्दल खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संताप व्यक्त केला असून, रोजगार मेळाव्याची वाट न पाहता त्वरित प्रशासकीय स्तरावर नियुक्तीपत्रे देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून केली आहे.
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना सप्टेंबर २०२५ मध्ये आयोजित ‘रोजगार मेळाव्या’त नियुक्ती मिळण्याची आशा होती. मात्र तो मेळावा वारंवार पुढे ढकलला जात असल्याने निवड होऊनही नोकरीसाठी वाट पाहावी लागत आहे. यामुळे उमेदवारांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण काळ वाया जात असून त्यांच्यात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. ही नियुक्ती प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास त्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होईल, अशी तीव्र चिंता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, “कागदपत्रे पडताळणी पूर्ण झालेल्या आणि निवड निश्चित झालेल्या उमेदवारांना केवळ ‘मेळाव्या’च्या सोहळ्यासाठी थांबवणे हे योग्य नाही. नियुक्तीसाठी एवढा मोठा विलंब होणे म्हणजे आमच्या तरुण पिढीच्या भविष्याशी खेळण्यासारखे आहे.”
त्यांनी मागणी केली आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन, कोणत्याही राजकीय सोहळ्याची किंवा मेळाव्याची वाट न पाहता, प्रशासकीय स्तरावर त्वरित नियुक्तीपत्रे देऊन लिपिक-टंकलेखक पदावरील उमेदवारांना तात्काळ न्याय द्यावा.