ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत दोन नगरसेवक व एक प्रभाग वाढला

२९ नगरसेवक १४ प्रभाग : भद्रावती नगर परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर : नागरिकांसमोर नवा नकाशा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           भद्रावती नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रारूप व अंतिम प्रभाग रचना प्रक्रियेनंतर निश्चित झाली असून २५ सप्टेंबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोग प्राधिकृत विभागीय आयुक्त नागपूर यांनी अंतिम मान्यता दिली आहे. या मान्यतेनंतर अंतिम प्रभाग रचना नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती भद्रावती नगर परिषद मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांनी दिली आहे.

११ जून ते २४ जुलै २०२५ दरम्यान प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी २९ जुलै रोजी नगर विकास विभागाकडे शिफारस केली. शासनाच्या आदेशानुसार नागरिकांकडून १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान सूचना व हरकती मागविण्यात आल्या. जिल्हाधिकारी यांनी एक ते आठ सप्टेंबर दरम्यान सुनावणी घेऊन त्याबाबत अहवाल नगर विकास विभागाकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने २५ सप्टेंबर रोजी प्रादेशिक संचालकांनी अंतिम मान्यता दिली.

प्रभाग रचनेबाबत फक्त एकच आक्षेप आलेला होता

२०१८ च्या तुलनेत २०२५ मधील बदल

२०१८ च्या नगरपरिषद भद्रावती निवडणुकीत एकूण २७ नगरसेवक व १३ प्रभाग होते. २०२५ मध्ये २९ नगरसेवक व १४ प्रभाग निश्चित झाले आहे. मागील तुलनेत दोन सदस्य व एक प्रभागाची वाढ झाली आहे. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक असतील व शेवटच्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जातील.

२०१८ मधील प्रभाग क्रमांक दोन ,तीन व चार मध्ये सीमा किंवा लोकसंख्येच्या बाबतीत बदल नाही. उर्वरित प्रभागांमध्ये काही प्रमाणात बदल झालेला आहे .प्रभाग क्रमांक एक मध्ये चिचोर्डी गाव, गौतम नगरचा संपूर्ण भाग, ठेंगे प्लॉट व गुरु नगरचा काही भाग समाविष्ट आहे. यामधील संताजी नगरचा भाग प्रभाग क्रमांक सात मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. याप्रमाणे एकूणच काही बदल झाल्याने मागील तुलनेत एक प्रभाग वाढला आहे. प्रभाग वाढल्यामुळे एकूण सदस्य संख्या २७ वरून २९ इतकी झाली आहे .

 आरक्षणाची सद्यस्थिती

 कोणते आरक्षण कोणत्या प्रभागात राहील हे अद्याप पावेतो निश्चित झालेले नाही. तसेच थेट जनतेतून निवडून येणाऱ्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण शासन स्तरावर निश्चित होणार आहे .

२०११ च्या जनगणनेनुसार भद्रावती शहराची लोकसंख्या ६०,५६५ इतकी आहे. सुधारित धोरणांमुळे झालेल्या या बदलामुळे आगामी निवडणूक अधिक व्यापक व प्रतिनिधीक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये