श्री माता महाकाली महोत्सवात स्त्रीशक्तीचा गौरव, कन्यापूजन व लेणसौभाग्याचे उपक्रमाने भक्तिमय वातावरण..
स्थानिक कलावंताचे विविध कार्यक्रम, 9 हजार 999 कन्यांचे पूजन व भोजन

चांदा ब्लास्ट
नवरात्रीत कन्येचे स्थान सर्वोच्च मानले जाते. याच परंपरेला उजाळा देत श्री माता महाकाली महोत्सवात कन्यामहत्त्व अधोरेखित करणारा अभूतपूर्व उपक्रम पार पडला. या अंतर्गत तब्बल 9 हजार 999 कन्यांचे पूजन व भोजन भक्तिभावाने करण्यात आले. महोत्सवात स्त्रीशक्तीचा गौरव अधोरेखित करणारा लेणसौभाग्याचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या तब्बल 25 हजार महिलांना हिरवा चुडा भरून देत सन्मान करण्यात आला
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आयोजित श्री माता महाकाली महोत्सवात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जात आहेत. हा महोत्सव चंद्रपूरच्या एकतेचा लोकमहोत्सव बनला असून विविध सामाजिक संघटना, मंडळे, समाज या महोत्सवात स्वयंपूर्तीने सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे महिलांचा सन्मान करणारे उपक्रम या महोत्सवात राबविले जात आहेत. या अंतर्गत 9 हजार 999 मायमाउलींचा सन्मान, नवरात्री दरम्यान जन्मलेल्या कन्यांना चांदीचे नाणे देऊन गौरविण्यात आले.
तसेच श्री माता महाकाली महोत्सवात कन्यापूजन आणि भोजनाच्या माध्यमातून महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या शक्तीस्वरूपिनींच्या प्रतिरूप मानल्या जाणाऱ्या कन्यांच्या चरणांचे पूजन, आरती व नैवेद्य अर्पण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर सर्व कन्यांना प्रेमपूर्वक भोजन घालण्यात आले. हा सोहळा उपस्थित भाविकांच्या हृदयात कायमचा कोरला गेला.
याच महोत्सवात स्त्रीशक्तीचा गौरव अधोरेखित करणारा सौभाग्यवतींना अखंड सौभाग्याची कामना करण्यासाठी लेणसौभाग्याचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या तब्बल 25 हजाराहून अधिक महिलांना हिरवा चुडा भरून देत मंगलकामना करण्यात आल्या. सौभाग्य, मंगल आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या बांगड्या भरून देत श्रीशक्तीचा जागर यावेळी करण्यात आला. कन्यापूजन व लेणसौभाग्य या दोन पवित्र सोहळ्यांनी महाकाली महोत्सवाला धार्मिक व सांस्कृतिक अधिष्ठान लाभले. स्त्रीशक्तीचा गौरव, भक्तीचा उत्कट भाव आणि समाजातील परंपरेचा सन्मान अशा या दुहेरी आयोजनामुळे महाकाली महोत्सव अधिकच संस्मरणीय ठरला.
महाकाली महोत्सवात साधना सरगम यांच्या स्वरांनी भक्तांचे मन भारावले
श्री माता महाकाली महोत्सवाच्या पावन वातावरणात काल संध्याकाळी सुप्रसिद्ध गायीका साधना सरगम यांच्या स्वरमधुर गायकतेने भाविक मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या गाण्याने भक्तिरसाचा सुरेल दरबारच महोत्सवात रंगून गेला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी संदीप देशपांडे, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते महाकाली मातेला महाआरती अर्पण करण्यात आली. आरतीच्या तेजोमय लखलखाटात साधना सरगम यांनी आपल्या गोड, सुरेल आणि आत्मस्पर्शी आवाजात भजन सादर करण्यास प्रारंभ केला. त्यांच्या सुरांच्या गोड लहरींनी मंदिर परिसरातील वातावरण जणू दिव्य तेजाने उजळून निघाले.