‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत वरोरा उपजिल्हा रुग्णालयात भव्य आरोग्य शिबिर
एक स्वस्थ स्त्री म्हणजे एक सशक्त कुटुंबाचा पाया - आमदार देवतळे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने
वरोरा : “एक स्वस्थ स्त्री म्हणजे एक सशक्त कुटुंबांचा पाया” असल्याचे प्रतिपादन आमदार करण देवतळे यांनी केले. वरोरा तालुक्यातील नागरिक, महिला व बालकांना आरोग्य सेवेचा लाभ देण्यासाठी शनिवार वरोरा उपजिल्हा रुग्णाच्या वतीने ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत स्थानिक रुग्णालय परिसरात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे होते.
मंचावर वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल खुजे, डॉ. शीतल शामकुळे, डॉ.संदीप पिपरे, डॉ. प्रवीण केशवानी, सीडीपीओ शरद पारखी, आश्लेषा जीवतोडे, बाळू भोयर, सुभाष दांदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, स्त्रीचे आरोग्य हे केवळ तिच्यासाठी नव्हे, तर संपूर्ण कुटुंबांसाठी, संपूर्ण समाजासाठी अत्यंत गरजेचे आहे. तिच्या आरोग्यावर संपूर्ण घर फिरत असल्याने तिला निरोगी ठेवणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते पुढे म्हणाले की, स्वस्थ नारी, सशक्त परिवार ‘ या अभियानाचा उद्देश महिला सक्षमीकरण, राष्ट्र निर्माण आणि आरोग्य सुधार आहे. त्यांनी वरोरा उपजिल्हा रुग्णालयीन सेवेसंबंधी समाधान व्यक्त केले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चिंचोळे यांनी महिला व बालकांचे महत्त्व अधोरेखित करुन ” महिला – बालकांचे आरोग्य म्हणजे समाजाच्या आरोग्याचे रक्षण” असे प्रतिपादन केले. संतुलित आहार, व्यायाम आणि विश्रांती, नियमित आरोग्य तपासणी आणि मानसिक आरोग्य ही निरोगी आरोग्याची चतुसुत्री असल्याचे स्पष्ट केले.
डॉ. खुजे म्हणाले की, महिला व बालकांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे, मानसिक आरोग्य समुपदेशन, योगासन, पूरक आहार, पाककृती प्रदर्शन, पोषण शपथ, प्रसुती पूर्व तपासणी, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, कॅन्सर तपासणी (स्तन, गर्भाशय आणि तोंड ) क्षयरोग तपासणी एचआयव्ही, टी बी तपासणी, सिकलसेल तपासणी, अॅनिमिया तपासणी, दंत तपासणी आदी सेवा बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात आयोजित आरोग्य शिबिरात जनतेने आपल्या आरोग्याची तपासणी करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भोयर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
या शिबिरात मान्यवरांनी विविध स्टॉल व आहार प्रदर्शनीला भेट देऊन तपशीलवार माहिती घेतली.
शिबिरात एकूण ८५२ रुग्णाची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. रक्तदान शिबिरात २२ स्वंयसेवकांनी रक्तदान केले. याशिवाय १५१ रुग्णाची कर्करोग तपासणी, १९ गर्भवती मातांची तपासणी, ५२ आयुष्यमान कार्डाचे वाटप, बालकाचे लसीकरण, वयोवृद्धांना वय वंदन कार्डाचे वाटप, चित्रप्रदर्शनी तसेच विविध आरोग्य विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
शिबिराचे संचालन गोविंद कुंभारे यांनी केले तर आभार सोनाली रासपायले यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
शिबिराला मोठ्या संख्येने महिला, पुरुष, बालके तसेच सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांनी उपस्थिती लावली.