चंद्रपूरातील १६ हजार कुटुंबांना कायमस्वरूपी घरपट्टे मिळणार – ना. बावनकुळे
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तीन जाहीर सभा, पट्टे मिळालेल्या नागरिकांनी केले बावनकुळे यांचे स्वागत

चांदा ब्लास्ट
आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील नजुलधारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी अधिवेशनात केली होती. ती पूर्ण करता येत असल्याचा आनंद आहे. चंद्रपूरातील ५५ झोपडपट्टी भागांतील १६ हजार घरांना आपण जागेचे कायमस्वरूपी पट्टे देणार असून, याची प्रक्रिया सुरू झाली आहे. चंद्रपूर विकासाच्या दिशेने गतिशील होत असताना भारतीय जनता पार्टीतील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देत ही गती दुप्पट करा, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूरातील सभांना संबोधित करताना मतदारांना केले.
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभा आज सपना टॉकीज चौक, बाबुपेठ सिद्धार्थ नगर आणि इंदिरा नगर येथे जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके, निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती, निवडणूक प्रभारी माजी खासदार अशोक नेते, शिवसेनेचे जिल्हा संघटक युवराज धानोरकर, जिल्हाध्यक्ष बंडू हजारे, जटपुरा प्रभागातील उमेदवार भाग्यश्री हांडे, छबू वैरागडे, रवी लोणकर, प्रमोद क्षिरसागर, इंदिरा नगर एम.ई.एल. प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निलेश गवळी, जितेश कुळमेथे, आशा देशमुख, सविता सरकार, इंडस्ट्रियल प्रभागातील उमेदवार राजलक्ष्मी कारंगल, सुनीता जैसवाल, महेश झीटे, चंद्रशेखर शेट्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभागातील रमेश पुलीपाका, राजू तोडासे, प्रतिमा ठाकूर, लालपेठ कॉलरी प्रभागातील उमेदवार कल्पना बबुलकर, ज्योती गेडाम, सविता कणकम बाबुपेठ प्रभागातील रमेश दुयोर्धन, अश्विनी पिंपळशेंडे, श्रुती ठाकूर, प्रदीप किरमे आदी उमेदवारांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना काँग्रेसवर आरोप करताना ते म्हणाले की, काँग्रेस तोडांचे वाफारे सोडणारा पक्ष आहे. विकासाचे व्हिजन त्यांच्याकडे नाही. तुमच्या मतांचे दान घेऊन ते पडून जातील; मात्र आमदार किशोर जोरगेवार यांनी आपली मते कर्जस्वरूपात घेतली आहेत. विविध विकासकामांच्या माध्यमातून ते कर्ज फेडण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या हाताला अधिक बळ देण्याची गरज आहे.
आपण चंद्रपूरातील घरांचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करून मॅपिंग करणार आहोत. यासाठी लागणारा खर्च नागरिकांना करावा लागणार नसून तो शासन करणार आहे. प्रत्येक घराचे स्वामित्व, नकाशा आणि प्रॉपर्टी कार्ड आपण नागरिकांना मोफत देणार आहोत. ब्ल्यू लाईनमध्ये असलेल्या घरांना मंजुरी देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. पुढे आपल्याला शहराचे श्वास असलेल्या रामाळा तलावाचे पुनरुज्जीवन करायचे आहे. अनेक विकासकामे प्रस्तावित आहेत. चंद्रपूरातील विकासाच्या गाडीला जोमाने चालवण्यासाठी यात भाजपचा महापौर चालक म्हणून असायला हवा. केंद्रातील ५५ योजना, राज्य सरकारच्या ४८ योजना, डीपीसीच्या २२ योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक प्रभागात भारतीय जनता पार्टीच्या सेवाभावी नगरसेवकांची आवश्यकता असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण चंद्रपूरात १५ हजार घरे बांधून देणार असून ५० महिला बचत गटांना ५० लाख रुपयांचे अनुदान देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर कार्यालयाचे ना. बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन
गांधी चौकात नव्याने सुरू करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या जनसंपर्क कार्यालयाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शहराच्या मध्यभागी असलेले हे भारतीय जनता पार्टीचे पहिले कार्यालय असून, तीन मजली या कार्यालयात जनसंपर्क, कार्यकर्ता मीटिंग रूम अशा उत्तम व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सुटतील व पक्ष संघटना बळकट करण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास यावेळी ना. बावनकुळे यांनी व्यक्त केला.
घरपट्टे मिळालेल्या नागरिकांकडून ना. बावनकुळे यांचे स्वागत
चंद्रपूरात कायमस्वरूपी घरपट्टे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनेक नागरिकांना पट्टे वाटप करण्यात आले असून, पट्टे मिळालेल्या नागरिकांकडून घुटकाळा येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्यक्त करत स्वागत करण्यात आले. ही सुरुवात असून चंद्रपूरात आपण १६ हजार नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.




