जिल्हा पोलीस विभागातर्फे जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन (रेडिंग डे) सप्ताहाचे औचित्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन (रेडिंग डे) सप्ताहाचे औचित्य साधून वर्धा जिल्हा पोलीस विभागातर्फे जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पोलीस विभागाचे कार्य, जवावदाऱ्या आणि सेवा यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व विशेषतः विद्यार्थी वर्गाला व्हावी, या उद्देशाने वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालय येथील परेड प्रांगणात भव्य ‘पोलीस प्रदर्शनी’चे आयोजन करण्यात आले होते.
प्रदर्शनीला मोठा प्रतिसाद
दिनांक ०६ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या शुभहस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये वाहतूक शाखा, डायल ११२, सायबर सेल, शख प्रदर्शनी, छान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकासह एकूण १० स्टॉल्स उभारण्यात आले होते. वर्धा शहरातील ३४ शाळांमधील अंदाजे ३५०० विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट देऊन पोलीस दलाच्या कामकाजाची माहिती घेतली.
महत्त्वाची सूचनाः पोलीस भरती उमेदवारांसाठी विशेष मार्गदर्शन
पोलीस वर्धापन दिन सप्ताहाचाच एक भाग म्हणून, जिल्ह्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे दि. ०८/०१/२०२६ सकाळी १०:०० वाजता आशीर्वाद सभागृह, पोलीस मुख्यालय, वर्धा येथे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात पोलीस भरती प्रक्रियेतील विविध टप्पे, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबत पोलीस दलातील अनुभवी अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आशीर्वाद सभागृह येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे केले आहे.



