गावाच्या विकासासाठी आमरण उपोषणाची चेतावणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर – प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गावातील विकासकामे व प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे तालुका प्रमुख अमोल मांढरे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी घुग्घुस यांना दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे.
नवरात्रीनिमित्त 22 सप्टेंबर 2025 पासून प्रमोद महाजन रंगमंच येथे हे उपोषण सुरू करण्यात येणार असून, यापूर्वीही 2024 मध्ये करण्यात आलेल्या लक्षवेधी उपोषणाकडे प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे यावेळी गंभीर पवित्रा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या अशा आहेत –
महसूल विभागांतर्गत येणाऱ्या इमारतीला ‘दिव्यांग भवन’ घोषित करून दिव्यांग बांधवांसाठी खुली करणे.
गावातील नवीन सरकारी दवाखाना तातडीने सुरू करणे.
2019 च्या निवडणुकीत दिलेले 200 युनिट मोफत वीजचे आश्वासन पूर्ण करणे.
गावातील प्रमुख चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणे.
गावातील सर्व दारू दुकाने व बार दोन किलोमीटर अंतरावर हलवणे.
गांधी चौकात महात्मा गांधी स्मारक उभारणे.
एसीसी प्रशासनाच्या फटाका मैदानावर संत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या नावाने सांस्कृतिक मंच तयार करणे.
गावातील मोठा तलाव व दीक्षित तलावाचे सौंदर्यीकरण करणे.
मिरची मार्केट परिसरात महर्षी वाल्मिकी महाराजांचा पुतळा उभारून त्या चौकाला “महर्षी वाल्मिकी चौक” नाव देणे.
प्रहार जनशक्ती पक्षाने स्पष्ट केले आहे की, या मागण्या जनतेच्या भावना व गरजांशी निगडीत आहेत. प्रशासनाने यावेळी तरी गांभीर्याने लक्ष घालून निर्णय घ्यावा, अन्यथा उपोषण आंदोलन उग्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.