ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विशेष लेख : भंते कश्यप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

भंते कश्यप, ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर येथे सन २००८ पासून मागील १७ वर्षांपासून वास्तव्याला आहेत. हे मुळचे मौजा केवाळापेठ तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. ह्यांच्या वयाला ९२ वे वर्ष सुरू असून यांचा जन्म- १२/०६/१९३४ ला मौजा केवाळा तालुका चिमूर येथे झाला.

भंते कश्यप यांचे पुर्वाश्रमीचे नाव- विठोबा परसराम लाडे शिक्षण- मराठी चौथा वर्गापर्यंत शिक्षण घेतले. यांच्या परिवारात यांची पत्नी कल्पना आणि १) अविनाश २) संदेश ३) जितेंद्र तीन मुले असा परिवार आहे. पत्नी कल्पना ही दोन वर्षांपूर्वी दिवंगत झाली.

भंते कश्यप यांना अगदी लहानपणापासून सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्याची आवड होती. यांच्या गावातील भजन कीर्तन मंडळात हे हिरीरीने भाग घेत असत. तसेच सणासुदीच्या दिवसांत नाटक बसवित होते. आधुनिक आणि पौराणिक, ऐतिहासिक रंगभूमीवरील सर्व साहित्य यांच्याकडे उपलब्ध असायचे.

बाबासाहेबांच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय चळवळीत काम करत असताना गावोगावी फिरून बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शेड्युल कास्ट फेडरेशनमध्ये काम करत होते. धम्मदीक्षा घेतल्यानंतर भारतीय बौद्ध महासभा आणि बॉरिस्टर राजभाऊ खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षांचे काम करत होते.

बाबासाहेबांनी नागपुरात बौद्ध धम्म दीक्षा क्रांती केली त्यावेळी भंतेजीचे वय २२ वर्षांचे होते. त्यावेळी महामंडळाच्या बसेस सुरू झाल्या नव्हत्या. खाजगी बसेसनी नागपूर येथील धम्मदीक्षेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले. भंतेजीनी नागपूर तसेच चंद्रपूर येथे दोन्ही जागी धम्मदीक्षेच्या कार्यक्रमात सहभागी होऊन धम्मदीक्षा घेतली.

भंतेजी बाबासाहेबांच्या धार्मिक आणि राजकीय चळवळीत हिरीरीने सहभागी होत असत. त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे भाऊ श्रीहरी खोब्रागडे हे जिल्हा अध्यक्ष होते. यांच्या नेतृत्वाखाली भंते कश्यप यांनी भारतीय बौद्ध महासभा चिमूर तालुका अध्यक्ष म्हणून काम केले होते. यामाध्यमातून संपूर्ण चिमूर तालुका पिंजून काढत बुद्ध धम्म आणि बावीस प्रतिज्ञा यांचा प्रचार आणि प्रसार केला.

विविध सामाजिक कार्यात धडाडीने भाग घेत असल्यामुळे यांच्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या चिमूर तालुक्याची जबाबदारी सुद्धा देण्यात आली. त्यावेळी चिमूर तालुका अध्यक्ष हरिदास जांभुळकर यांच्या नेतृत्वाखाली भंतेजीनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चिमूर तालुका उपाध्यक्ष म्हणून समर्थपणे जबाबदारी स्वीकारली होती.

दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सन १९६४ ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जागतिक दर्जाचे देशव्यापी भूमिहीनांचा सत्याग्रह केला होता. त्या आंदोलनात भंते कश्यप यांच्या नेतृत्वात चिमूर तालुक्यातून ७१ आंदोलनकर्त्यांनी सहभाग घेतला. हे सर्व आंदोलनकर्ते १५ दिवस नागपूर येथील सेंट्रल जेलमध्ये बंद होते. जेलमध्ये सकाळी आंबील आणि दुपारच्या वेळी भात, पोळी आणि वरण असे भोजन मिळत होते.

जेलमधून सुटून आल्यावर सामाजिक, धार्मिक आणि राजकीय चळवळीत काम करीत असतानाच सन १९७७- ७८ मध्ये मुलाबाळांच्या शिक्षणासाठी नागपूर येथे राहायला गेले. पत्नीला मुलाबाळासोबत नागपूर येथे ठेवून भंतेची चिमूर केवाळापेठ आणि नागपूर अशी भ्रमंती सुरू केली.

नागपूर येथे राहायला गेल्यावर नागपूर येथील रिपब्लिकन पक्षाचे खोरिपचे नेते मधुकर टेंभुर्णे, प्रभाकर कोचे, रामानंद ढेपे, तेजराम सोमकुंवर, उमाकांत रामटेके यांच्या संपर्कात येऊन तिथे सुद्धा रिपब्लिकन पक्षाचे काम सुरूच ठेवले होते.

भंतेची सासूरवाडी नागपूर येथील होती. काही दिवस भंते सासऱ्याच्या घरीच राहत असताना स्वतःचे घर असावे म्हणून जागेचा शोध घेऊन विटा बनविणाऱ्या कुंभाराच्या खाली आणि टाकून दुसरीकडे निघून गेलेल्या जागेवर जाऊन मुकुंदा मोटघरे, रघुवीर टेंभुर्णे आणि भंते यांनी एकत्र येऊन धम्मदीपनगर नावांची वस्ती बनविली. या धम्मदीपनगरीत विश्वशांती बुद्धविहार यांची निर्मिती केली.

इथे मुलांचे शिक्षण पाणी होऊन मोठा मुलगा अविनाश हा भारत सरकारच्या डी ए जी पी टी या खात्यात अकाउंट म्हणून नोकरीला आहेत. दुसरा मुलगा संदेश छत्तीसगढ रायपूर येथे एका कंपनीत अकाउंट म्हणून नोकरीला आहेत. तीसरा मुलगा जितेंद्र हा नागपूर येथे मसाले पदार्थ तयार करण्याचा स्वतंत्र व्यवसाय करतो.

सर्व मुलाबाळांना कामधंद्याला लावल्यावर या जबाबदारीतून मोकळे होऊन भंते कश्यप हे ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर येथे वास्तव्यास असलेल्या भंते बुद्धप्रिय यांच्या संपर्कात आले. सन २००८ मध्ये भंते बुद्धप्रिय यांच्या हस्ते ऐतिहासिक बुद्धभूमी येथे श्रामणेरची दीक्षा घेतली आणि सन २०१० मध्ये भंते शांती रक्षित नागपूर यांच्या हस्ते कन्हान नदीच्या पात्रात उपसंपदेची दीक्षा घेऊन भंते झाले. तेव्हा पासून भंते कश्यप हे ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर येथे वास्तव्यास आहेत.

शब्दांकन-

अशोककुमार उमरे 8698842402

रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये