भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या विविध प्रभागांतील प्रचार कार्यालयांचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध प्रभागांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
शहरातील प्रभाग क्रमांक १ तुकुम, प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगर, प्रभाग क्रमांक 3 एम.ई.एल., प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प, प्रभाग क्रमांक ५ विवेक नगर, प्रभाग क्रमांक ६ इंडस्ट्रियल इस्टेट, प्रभाग क्रमांक ७ जटपुरा, प्रभाग क्रमांक ८ वडगाव, प्रभाग क्रमांक ९ नगिनाबाग, प्रभाग क्रमांक १० एकोरी, प्रभाग क्रमांक ११ भानापेठ, प्रभाग क्रमांक १२ महाकाली, प्रभाग क्रमांक १३ बाबूपेठ, प्रभाग क्रमांक १५ विठ्ठल मंदिर आणि प्रभाग क्रमांक १७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे प्रचार कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रचार कार्यालयांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या समस्या ऐकून घेणे, विकासकामांबाबत सूचना व तक्रारी नोंदवणे हा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महायुतीच्या माध्यमातून चंद्रपूर शहराचा सर्वांगीण व समतोल विकास साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर शहराच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे. तुकुम पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपर्यंत प्रत्येक प्रभागाचा विकास हा आमचा अजेंडा आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, घरपट्टे, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार हे आमचे प्राधान्याचे विषय आहेत. नागरिकांचा विश्वास, कार्यकर्त्यांची ताकद आणि महायुतीची एकजूट याच्या जोरावर चंद्रपूर शहरात विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून चंद्रपूरच्या विकासाला गती देण्याचे यावेळी बोलतांना आमदार किशार जोरगेवार यांनी केले.



