ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवनियुक्त नगराध्यक्ष निलेश ताजने यांना शह देण्याचे राजकारण

आजी-माजी आमदारांकडून ‘घेराबंदी’चा प्रयत्न?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- गडचांदूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये जनतेने स्पष्ट आणि ठाम कौल दिला असला, तरी निकालानंतर शहराच्या राजकारणात नव्या सत्तासमीकरणांना आकार देणारी शह-काटशहाची राजकीय खेळी वेगाने सुरू झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आलेले निलेश शंकरराव ताजने यांनी दणदणीत विजय मिळवत पारंपरिक राजकीय समीकरणांना जोरदार धक्का दिला आहे.

” *जनतेचा स्पष्ट कौल; प्रस्थापितांना नाकारले”* :

अधिकृत निकालानुसार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निलेश शंकरराव ताजने यांना ५,७३६ मते मिळाली. काँग्रेस पुरस्कृत सचिन पांडुरंग भोयर यांना ३,११३ मते, तर भाजप पुरस्कृत उमेदवार अरविंद तुकाराम डोहे यांना २,८६५ मते मिळाली. या निकालावरून गडचांदूरच्या मतदारांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना नाकारत व्यक्तिगत नेतृत्व आणि स्वतंत्र राजकीय भूमिकेला प्राधान्य दिल्याचे स्पष्टपणे अधोरेखित होते.

 *बंडखोरी, जनसंपर्क आणि वैयक्तिक प्रभाव*

निलेश ताजने यांनी विद्यमान राजकीय व्यवस्थेला छेद देत भाजपमधून बंडखोरी केली आणि ‘ *गडचांदूर शहर विकास आघाडीव* च्या माध्यमातून निवडणूक लढवली. विशेष म्हणजे, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारसभेनंतर ही जनतेने ताजने यांनाच स्पष्ट कौल दिला. त्यांच्या आघाडीचे २० पैकी ५ नगरसेवक निवडून आले असून, काही उमेदवार अतिशय कमी मतफरकाने पराभूत झाले. यावरून ताजने यांची संघटन क्षमता, जनतेशी असलेला संपर्क आणि शहरातील स्थानिक पकड स्पष्टपणे दिसून येत आहे.

 *आजी–माजी आमदारांची रणनीती*

निकालानंतर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, माजी आमदार सुभाष धोटे आणि विद्यमान आमदार देवराव भोंगळे यांचे पक्ष नगरपरिषदेत संख्याबळाने मर्यादित असतानाही, प्रशासकीय प्रक्रियांच्या माध्यमातून नगराध्यक्ष ताजने यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा शहरात आहे.

 *उपनगराध्यक्ष पद:* या पदाच्या निवडीत बहुमताचे गणित वापरून नगराध्यक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 *स्थायी समिती व विषय समित्या:* समित्यांवरील नियंत्रण मिळवून नगराध्यक्षांच्या निर्णयक्षमतेवर मर्यादा आणण्याची रणनीती आखली जात असल्याचे संकेत आहेत.

 *स्वीकृत सदस्य:* या निवडीमध्येही तांत्रिक बाबींचा आधार घेत हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न होऊ शकतात, अशी चर्चा आहे.

 *सत्तासमीकरण आणि पडद्यामागील हालचाली*

भाजप आणि काँग्रेस हे परस्परविरोधी गट असूनही, ताजने यांच्या वाढत्या स्वतंत्र राजकीय प्रभावाला रोखण्यासाठी मूक समन्वय साधत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षासमोर अप्रत्यक्ष राजकीय दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे जनतेमध्ये बोलले जात आहे.

 *शहराच्या विकासाचे भवितव्य?*

निलेश ताजने यांच्यासमोर शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी आहे. मात्र नगरपरिषदेतले संख्याबळ, समित्यांवरील नियंत्रण आणि आजी–माजी आमदारांचा हस्तक्षेप पाहता, आगामी काळात विकासाला गती मिळते की राजकीय कुरघोड्यांमध्ये गडचांदूर अडकतो, हेच खरे निर्णायक ठरणार आहे.

जनतेने दिलेल्या कौलाचा सन्मान राखत विकासकेंद्री राजकारण घडते की सत्तासमीकरणांच्या खेळात तो कौल दुर्लक्षित राहतो, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष केंद्रित झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये