पोलीस वर्धापन दिन सप्ताहानिमित्त वर्धा जिल्हा पोलिस विभागातर्फे युवक-युवतींसाठी पोलीस भरती मार्गदर्शन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सप्ताहाचे औचित्य साधून वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी एका विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज दि. ०८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पोलीस मुख्यालय येथील ‘आशीर्वाद सभागृह’ येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन
या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (पुलगाव) श्रीमती वंदना कारखेले आणि पोलीस उपनिरीक्षक विशाल सवई यांनी देखील उपस्थित राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोलाचे मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्देः कार्यक्रमादरम्यान पोलीस दलातील अनुभवी अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेच्या प्रत्येक पैलूवर सविस्तर प्रकाश टाकलाः शारीरिक चाचणी (Physical Test): मैदानी चाचणीत उत्तम गुण मिळवण्यासाठी सराव कसा करावा, आहार कसा असावा आणि शारीरिक क्षमतेत वाढ कशी करावी, याबद्दल सविस्तर टिप्स देण्यात आल्या. लेखी परीक्षा (Written Exam): सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या विषयांची तयारी करण्याच्या पद्धती आणि वेळेचे नियोजन यावर मार्गदर्शन करण्यात आले. भरती प्रक्रियेचे टप्पेः अर्ज भरण्यापासून ते अंतिम निवडीपर्यंतच्या सर्व तांत्रिक आणि कायदेशीर टप्प्यांची माहिती युवकांना देण्यात आली.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या शेकडो युवक-युवतींनी या मेळाव्याला हजेरी लावली होती. आशीर्वाद सभागृह यावेळी उमेदवारांच्या गर्दीने तुडुंब भरले होते. अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून तरुणांना केवळ भरतीसाठीच नव्हे, तर एक शिस्तप्रिय नागरिक बनण्यासाठी देखील प्रोत्साहित केले. “वर्धा जिल्ह्यातील तरुणांमध्ये मोठी जिद्द आहे. योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी पोलीस दलात सहभागी होऊन देशाची सेवा करावी, हाच या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.”
या कार्यक्रमामुळे पोलीस दलाविषयी युवकांच्या मनात असलेली भीती दूर होऊन त्यांना एक नवी दिशा मिळाली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक विलास पाटील वाहतूक शाखा, सहायक पोलिस निरीक्षक श्री आशिष चिलांगे सायबर सेल वर्धा, सहायक पोलिस निरीक्षक श्री संदीप कापडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, सायबर सेल वर्धा तसेच मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहायक पोलिस निरीक्षक श्री आशिष चिलांगे सायबर सेल वर्धा यांनी केले.



