ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाषेचा दर्जा घसरल्याने पत्रकारितेची विश्वासार्हता धोक्यात – प्राचार्य डॉ. मृणाल काळे

पत्रकार दिनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेत करिअरचे आवाहन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

राजेंद्र मर्दाने, वरोरा

वरोरा : अलीकडच्या काळात पत्रकारितेतील भाषेचा दर्जा सातत्याने खालावत चालल्याचे चित्र दिसून येत असून, ही बाब गंभीर चिंतेची आहे. त्यामुळे पत्रकारितेचे विश्वासर्हता धोक्यात येत असल्याचे परखड प्रतिपादन आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी येथे केले. पत्रकार सुरक्षा समिती, महाराष्ट्र शाखा वरोरा यांच्या वतीने आनंद निकेतन महाविद्यालयाच्या सभागृहात पत्रकार दिन सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सुरक्षा समितीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मर्दाने हे होते.

    व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू, ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस, तसेच पत्रकार सुरक्षा समितीचे वरोरा तालुकाध्यक्ष शाहीद अख्तर उपस्थित होते.

     डॉ. काळे पुढे म्हणाले की, भाषा ही पत्रकारितेची आत्मा आहे. प्रेस मध्ये प्रकाशित होणाऱ्या बातम्यांमधील शब्द संपदा, भाषेची मांडणी व आशयाची गुणवत्ता ही उच्च दर्जाची व वाचनीय असायला हवी मात्र आज अनेक बातम्यांमध्ये भाषिक चूका दिसून येतात. कधी कधीतर बातच्यांचा मथळ्यातील शब्द तुटक तुटक असतात. ज्यामुळे आशय स्पष्ट होत नाही. भाषेचा दर्जा घसरला तर पत्रकारितेचे सामाजिक दायित्व ही कमकुवत होते. तिचा दर्जा जपणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

   सध्याच्या माध्यम विश्वात विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. एमपीटीएल व स्वंय अभ्यास कोर्सेस मध्ये पत्रकारिता व मास कम्युनिकेश सारख्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. कोर्स मोफत उपलब्ध असून केवळ नाममात्र परीक्षाशुल्क आकारले जाते. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांची भाषिक गुणवत्ता लेखन कौशल्य व व्यावसायिक पात्रता विकसित होण्यास मदत हाईल. विद्यार्थ्यानी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य काळे यांनी केले.

     यावेळी बोलताना सुधाकर कडू म्हणाले की, बाळ शास्त्री जांभेकर यांचा काळ आणि आजचा काळ याच्यामध्ये खूप फरक आहे. काळच बदललेला आहे. खूप समस्या वाढल्या आहेत. त्याकाळात वेगळ्या समस्या होत्या, या काळात वेगळ्या समस्या आहेत. पत्रकारांचे कार्य लक्षात घेता त्यांचे नाते वेदनेशी आहे. आनंदवनाच्या आणि पत्रकारांच्या कार्यात कुठेतरी साम्य असल्याचे जाणवते. आयोजकांचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा असून स्तुत्य व अभिनंदनीय आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस म्हणाले की आज तांत्रिकदृष्ट्या प्रचंड प्रगती झाली असली तरीही संवेदनशील पत्रकारितेचे महत्व आजही अबाधित आहे. आज अनेक प्रस्थापित मिडीया संस्था सत्तेच्या पाठीशी राहताना दिसत आहे. अशा परिस्थितीत खऱ्या अर्थाने समाजहित जपणारी पत्रकारिता कमी होत चालली आहे. मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुरु असलेली पत्रकारिता ही बरीच आशादायी असून ती सामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडत आहे. युवकांनी निर्भीड, सत्यनिष्ठ व संवेदशील पत्रकारितेसाठीपुढे येणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन तडस यांनी केले.

       राजेंद्र मर्दाने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रसिद्ध शायर अकबर इलाहबादी यांचा शेर उद्धृत करत ” खिचों ना कमानो को, न तलवार निकालो, जब तोफ मुकाबिल हो, तो अखबार निकालो, ” असे सांगत वृत्तपत्राचे सामाजिक महत्व विशद केले. ६ जानेवारी हा पत्रकार दिन असून तो बाळशास्त्री जांभेकर यांची जंयती किंवा सृतिदिन नसल्याचे स्पष्ट केले. ‘ दर्पण ‘केवळ माहितेचे माध्यम नसून समाज जागृतीचे व्यासपीठ होते, असेही त्यांनी सांगितले.

      प्रास्ताविकात डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्याचा नेटक्या शब्दांत आढावा घेतला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित कर्तृत्ववान पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी केले, तर आभार हरीश केशवाणी यांनी मानले.

    कार्यक्रमात प्रा. मोक्षदा मनोहर, डॉ.रंजना लाड, प्रा. पल्लवी ताजने,  प्रा. रामदास कामडी, बबन अवघड़े नरेंद्र पाटील,संयोगिता वर्मा, अविनाश पंधरे, सामाजिक कायकर्ता राजेश ताजने, प्रवीण गंधारे, खेमचंद नेरकर, शेख शफी, तुलसीदास अलाम, धमेंद्र शेरकुरे, तुषार मर्दाने सह महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारीवृंद, विद्यार्थी – विद्यार्थीनी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये