मनपाच्या अधिकाधिक शाळा पीएमश्री व्हाव्या – उपायुक्त मंगेश खवले
आदर्श शिक्षक,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट
मनपा शाळांतील शिक्षकांची जुनी पिढी आता सेवानिवृत्त होत असुन नव्या पिढीवर विद्यार्थ्यांची जबाबदारी आली आहे, जुन्या शिक्षकांचा आदर्श ठेऊन व विद्यार्थ्यांचे सुप्त गुण ओळखुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्याचे काम नव्या पिढीच्या शिक्षकांनी करावे. आज मनपाच्या 26 पैकी 2 शाळा पीएमश्री आहेत,शिक्षक आपल्या प्रयत्नांनी किमान अर्ध्या शाळा तरी पीएमश्री करतील असा आशावाद उपायुक्त मंगेश खवले यांनी राणी हिराई सभागृहात आयोजित शिक्षक दिन समारंभात व्यक्त केला.
आपण किती वर्षे सेवा दिली यापेक्षा आपल्या पदाला किती न्याय दिला हे महत्वाचे आहे.आज शिक्षकांकडुन समाजाच्या मोठ्या अपेक्षा आहेत,सध्या शिक्षकाचे काम हे तणावाचे झाले असले तरी मनपा शाळांतील शिक्षक हे कायम आपल्या पदाला न्याय देतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.मात्र शासकीय सुट्टीमुळे 10 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी गुणवंत शिक्षक म्हणुन उमेश्वर आत्राम,अर्चना कुलसंगे यांचा ,एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट निकाल देणारे शिक्षक जोगेश्वर मोहारे,प्रणिता देशमुख,अजय माडोत तसेच 10 वीचा 100 टक्के निकाल देणारे उमा कुकडपवार,बी.गीता या शिक्षकांचा तर 10 वीत चांगले गुण मिळविणारे व एनएमएमएस परीक्षेत शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे ताडा व्यंकटरामरेड्डी,सूचित माळोदे,सय्यद पटेल,वर्षा सातपुते,रफिया खान,छाया कुराणकर,शरद शेंडे व नागेश नित या सेवानिवृत्त शिक्षकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सावित्रीबाई फुले शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व देशभक्तीपर गीत सादर केले. प्रास्ताविक केंद्र समन्वयक सुनील आत्राम तर संचालन स्वाती बेत्तावार यांनी केले. याप्रसंगी उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता रवींद्र हजारे, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी नागेश नीत तसेच सर्व मुख्याध्यापक,शिक्षकगण,विद्यार्थी उपस्थीत होते.