ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विरूर गाडेगाव कोळसा खाणीत स्थानिकांना डावलून बाहेरच्यांना काम

सरपंच गीता राजूरकर यांचा आरोप ; स्थानिकांना काम न दिल्यास बुधवारी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट

पैनगंगा विरूर गाडेगाव कोळसा खाणीत कोळसा उत्खननाचे काम अवतारसिंग ॲण्ड कंपनीला देण्यात आले आहे. मागील काही वर्षांपासून ही कंपनी येथे कोळशाचे उत्खनन करीत आहे. मात्र, खाणीत कामासाठी स्थानिक बेरोजगार युवकांना डावलून वणी, वरोरा, घुग्घूस तसेच राजकीय नेत्यांची शिफारस घेऊन आलेल्याच व्यक्तींना काम देण्यात आले आहे. दरम्यान, कंपनीच्या विरोधात परिसरातील विरूर, गाडेगव, सोनुर्ली आणि बोरगाव येथील नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर १२ जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक अडवू असा इशारा विरूर गाडेगावच्या सरपंच गीता राजूरकर, मनसेचे जिल्हा सचिव प्रकाश बोरकर, मनसे तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी चंद्रपुरात पत्रकार परिषदेत दिला आहे.

वेकोलितर्फे विरूर गाडेगाव येथे कोळसा खाण सुरू करण्यात आली आहे. येथे कोळशाचे उत्खनन करण्यात येत असून, शेकडो एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण भूमिहिन झाले. तर शेतीवर उपजीविका करणारे शेकडो शेतमजुरांच्याही हातचे काम हिरावले गेले आहे. मात्र, कंपनीने केवळ जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनाच काम दिले आहे. परंतु, शेतीवर उपजीविका असणाऱ्या शेतमजुरांना कामावरून डावलले आहे. या कंपनीत सहाशेवर कामगार काम करीत आहे. यापैकी केवळ दोनशे प्रकल्पग्रस्त असून, उर्वरित कामगार वरोरा, वणी, घुग्घूस तसेच राजकीय नेत्यांच्या संपर्कातील कार्यकर्त्यांना काम देण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी स्थानिकांनी अनेकदा काम देण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले आहे. मात्र, अवतारसिंग ॲण्ड कंपनीने कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.

परिणामी ७ जुलैपासून येथील सरपंच गीता राजूरकर यांनी महिलांसह बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र, तीन दिवसानंतरही उपोषणाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे १२ जुलै रोजी गाडेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला विनोद राजूरकर, तनुजा करमरकर व अन्य बेरोजगर युवक, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये