घुग्घुस नगर परिषदेच्या मौनावर प्रश्नचिन्ह
जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : घुग्घुस नगर परिषद कार्यालयाने पूर्वी सादर केलेल्या ज्ञापनावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यामुळे नाराज होऊन सामाजिक कार्यकर्ते प्रणयकुमार बंडी यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दिनांक ४ जुलै २०२५ रोजी “लॉयडस मेटल अँड एनर्जी प्रा. लि. कंपनीचा विस्तार, CSR निधी आणि रोजगार प्रक्रियेत पारदर्शकता” या संदर्भात सविस्तर ज्ञापन घुग्घुस नगर परिषद कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले होते. मात्र आजतागायत या ज्ञापनावर नगर परिषदेकडून कोणतीही लिखित प्रतिक्रिया किंवा माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
प्रणयकुमार बंडी यांनी आरोप केला आहे की घुग्घुस नगर परिषद कार्यालयाचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी आपले कर्तव्य टाळत आहेत. अधिकाऱ्यांच्या शिथिलतेमुळे घुग्घुसमध्ये सामाजिक असंतोष व शांततेचा भंग होण्याची शक्यता असून बेरोजगार युवकांवर अन्याय होऊ शकतो.
निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत—
नगर परिषद कार्यालयाचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या कर्तव्यच्युतीची चौकशी करण्यात यावी. या विषयावर योग्य विभागीय कारवाई सुनिश्चित करण्यात यावी.
४ जुलै २०२५ रोजी सादर करण्यात आलेल्या ज्ञापनावर आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची लिखित माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी.
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, उद्योग मंत्री, नगरविकास मंत्री आणि ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देखील पाठविण्यात आली आहे.