२९ नागरिकांना हलविले सुरक्षित स्थळी
आपत्ती प्रसंगी मनपाच्या १४ शाळांत घेता येणार आश्रय

चांदा ब्लास्ट
नियमित पाणीपुरवठा होतपर्यंत पाण्याचा जपुन वापर करण्याचे आवाहन
चंद्रपूर :_
मुसळधार पावसामुळे ईरई धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शहरातील काही ठिकाणी पूर सदृश परिस्थिती २ सप्टेंबरच्या रात्री निर्माण झाली होती. त्यामुळे शहरातील २९ नागरिकांना मनपा आपत्ती व्यवस्थापन चमूने महात्मा ज्योतिबा फुले शाळेत हलवून त्यांच्या निवारा व भोजनाची व्यवस्था केली आहे, त्याचप्रमाणे ईरई नदीतुन मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी येत असल्याने जलशुद्धीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले असुन पाणीपुरवठा नियमित होतपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपुन वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
२ सप्टेंबरच्या रात्री रहमत नगर व घुटकाला परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे या परिसरातील २९ नागरिकांना मनपा आपत्ती व्यवस्थापन चमूने सुरक्षित स्थळी हलविले आहे.पुढील काही दिवस सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा असल्याने मनपा अधिकारी कर्मचारी २४ तास अलर्ट मोडवर असुन नदी पात्रा लगतच्या नागरिकांनी कुठलीही जोखीम न घेता जवळच्या मनपा शाळेत आश्रय घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले आहे.
मनपा शाळेत आश्रयास असलेल्या नागरिकांसाठी शाळेत जेवण,पिण्याचे पाणी,झोपण्याची सोय,आरोग्य व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या असुन या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार प्रथमोपचार व औषधे देण्यात येत आहेत. तसेच पुराच्या पाण्याची पातळी कमी झालेल्या रहेमत नगर, फिल्टर प्लांट परिसरात साफ सफाई करुन ब्लीचिंग व लिंडेन पावडर टाकुन स्वच्छता करण्यात आली आहे. वाढते पाणी पाहता सर्वांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेण्याचे तसेच आपातकालीन प्रसंगी ०७१७२२५४६१४,०७१७२२५९४०६ (१०१),८९७५९९९४२७७,९८२३१०७१०१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
आपत्ती प्रसंगी या मनपा शाळांमध्ये घेता येईल आश्रय –
महात्मा ज्योतिबा फुले प्राथ. शाळा, घुटकाळा वार्ड, डॉ. जाकिर हुसेन उर्दू प्राथ. शाळा, दादमहल वार्ड, शहिद भगतसिंग प्राथ. शाळा, भिवापूर वार्ड, लोकमान्य टिळक कन्या प्राथ. शाळा, पठाणपूरा रोड, लोकमान्य टिळक प्राथ. शाळा, काळाराम मंदीर, समाधी वार्ड, डॉ. राजेंन्द्र प्रसाद प्राथ. शाळा, भानापेठ वार्ड,महाकाली कन्या प्राथमिक शाळा, महाकाली मंदिर वार्ड, रामचंद्रनगर हिन्दी प्राथ. शाळा, जटपूरा वार्ड,सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक शाळा, जटपूरा वार्ड, स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा, वंडगाव वार्ड, लालपेठ कॉलरी मराठी प्राथ. शाळा, बंगाली कॉलनी, भिवापूर वार्ड,महाकाली कॉलरी प्राथ. शाळा, महाकाली कॉलरी, महात्मा गांधी कन्या प्राथ. शाळा, रैय्यतवारी वार्ड,पी.एम.श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथ. व माध्यमिक शाळा, नेताजी चौक, बाबुपेठ