शिक्षणाची ज्योत पुन्हा प्रज्वलित, रेड क्रॉस भवन येथे अम्मा कि पढाई उपक्रमाला सुरुवात
अम्मा कि पढाई पुन्हा सुरू होत असल्याचा आनंद –आ. जोरगेवार

चांदा ब्लास्ट
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला अम्मा कि पढाई उपक्रम पुन्हा नव्याने रेडक्रॉस भवन येथे सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत 284 प्रतिभावंत, गरीब व गरजूं विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी निशुल्क मार्गदर्शन मिळणार आहे. रविवारी या उपक्रमाचा शुभारंभ आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आला. अम्माच्या आशीर्वादाने हा उपक्रम पुन्हा सुरू होत असल्याचा मला आनंद आहे, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू विजय आईंचवार, रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप रामटेके, सचिव गण्यारपवार, अजय जयस्वाल, अम्मा कि पढाई फाऊंडेशनचे उपाध्यक्ष संजय बेले, सचिव सुमित बेले, विश्वस्त नायब तहसीलदार प्रतिक बोडे, चंदु वासाडे, प्रसाद जोरगेवार, पोलिस उपनिरीक्षक अनिल देरकर, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, तुषार सोम, विमल कातकर, कौसर खान आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, काही काळ हा उपक्रम थांबला होता. तेव्हा खरंच अंतःकरणाला दुःख होत होतं. विद्यार्थ्यांची स्वप्नं, त्यांचा उत्साह आणि उर्मी यांना थोडा विराम मिळाल्यासारखं वाटलं. पण आज अम्मा कि पढाई पुन्हा सुरू होत आहे, हीच माझ्यासाठी खरी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. अम्माच्या आशीर्वादाने आणि समाजाच्या विश्वासाने हा प्रवास पुन्हा नव्या जोमानं पुढे नेण्याचा निर्धार केला आहे.
ते पुढे म्हणाले, शिक्षण हेच व्यक्तीला आयुष्यातील खरी ताकद देणारे साधन आहे. कुटुंबाची, गावाची आणि समाजाची उन्नती शिक्षणाशिवाय शक्य नाही. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी होण्यासाठी मोफत मार्गदर्शनाची संधी मिळावी, या हेतूने या उपक्रमाची सुरुवात केली. आज 284 विद्यार्थी या उपक्रमाचा भाग होत आहेत. हेच विद्यार्थी उद्या अधिकारी म्हणून जिल्ह्याचे आणि देशाचे नेतृत्व करतील, ही खात्री आहे.
या उपक्रमाचा उद्देश केवळ शिक्षण देणे नसून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, चिकाटी व समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा जागवणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा उपक्रम थांबवताना वेदना झाल्या; पण या काळात अनेकांनी प्रोत्साहन दिले. विशेषतः रोटरी क्लबने हॉल उपलब्ध करून मोठे सहकार्य केले. येथून पुन्हा नव्या जोमाने आम्ही हा उपक्रम पुढे नेणार आहोत. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, वेळेचे महत्त्व आणि मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करावे. विद्यार्थ्यांच्या पाठीशी पालक, शिक्षक आणि समाज आहे. की अम्मा कि पढाई उपक्रमाचा विस्तार करून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची ज्योत पोहोचवू, असे आमदार जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांची उपस्थिती होती.