अतिक्रमित वन जमिनीवरील पट्टे देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा – आमदार सुधीर मुनगंटीवार
कागदपत्रांची तपासणी करून आवश्यक पावले उचलण्याचे दिले निर्देश

चांदा ब्लास्ट
पोंभुर्णा तालुक्यातील मौजा देवई, केमारा व भटारी वनजमिनीवरील अतिक्रमण पट्टे देण्यासंदर्भात बैठक
चंद्रपूर, दि. 30: पोंभुर्णा तालुक्यातील मौजा देवई, केमारा आणि भटारी गावांतील वनजमिनीवरील अतिक्रमण पट्टे देण्यासंदर्भात राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत अतिक्रमित जमिनींचे सर्वेक्षण, वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दावे, तसेच निस्तारहक्कपत्रांसाठी आवश्यक कार्यवाही आणि कायदेशीर प्रक्रिया यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लाभार्थ्यांना पट्टे तात्काळ वितरित करण्यासाठी सर्व कागदपत्रे तपासून आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश आ.मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले.
पोंभुर्णा तालुक्यातील मौजा देवई, केमारा आणि भटारी येथील वनजमिनीवरील अतिक्रमण पट्टे देण्यासंदर्भात नियोजन भवनात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते.बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, आदिवासी चळवळीचे जिल्हा संघटक प्रमूख जगनजी येलके, गणेश परचाके सामजिक कार्यकर्ते, अल्का आत्राम, संध्याताई गुरनुले, डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, अजय दुबे, हरीश ढवस, गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, उपविभागीय अधिकारी अजय चरडे, पोंभुर्णाचे तहसीलदार मोहनिश शेलवटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी फनींद्र गादेवार तसेच संबंधित महसूल व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जमिनीबाबत तहसीलदार आणि वन अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची सर्व कागदपत्रांची पडताळणी करावी, तसेच पट्ट्यांबाबत उद्भवलेले वाद संवादातून सोडवावे. शासनाच्या धोरणानुसार पात्र लाभार्थ्यांना पट्टे देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची कार्यवाही करावी. महसूल तसेच वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण असेल तर कायद्यान्वये तपासून कॅम्प घेऊन पट्ट्याचा निर्णय घेता येईल. लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रे व पुरावे कॅम्पमध्ये घेऊन यावीत. जे पट्टे देता येईल ते तात्काळ दिले जावे. युद्ध पातळीवर कॅम्प घेऊन दाव्याची प्रकरणे निकाली काढावीत. सामुदायिक वनहक्क दाव्यांबाबत निस्तार हक्कपत्र देण्यासाठी शासन निर्णयानुसार त्रुटी पूर्ततेसाठी योग्य कागदपत्रासह तिन्ही गावांचे प्रस्ताव तयार करून आवश्यक कार्यवाही करा. सर्व कागदपत्रांची तपासणी करून अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करावी. वनजमिनीवरील अतिक्रमण पट्ट्यांबाबत समितीने दर आठवड्याला बैठक घेऊन महसूली व वनहक्काचे दावे निकाली काढावेत. असे निर्देश देखील त्यांनी बैठकीत दिले.
प्रायोगिक स्तरावर पोंभुर्णा तालुक्यातील वनजमिनीवरील अतिक्रमण पट्ट्यांचा प्रश्न प्रथम मार्गी लावावा. त्यानंतर मूल व बल्लारपूर तालुक्यांतील विषय मार्गी लावण्यात येतील. जेवढे पट्टे वितरित करता येतील ते तातडीने वाटप करण्याचे नियोजन करावे, असेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.