घुग्घुस नगर परिषद : ‘माझी वसुंधरा अभियान 6.0’ आणि स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत पर्यावरणपूरक गणपती स्पर्धा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर (घुग्घुस) – घुग्घुस नगर परिषदेतर्फे ‘माझी वसुंधरा अभियान 6.0’ व स्वच्छ सर्वेक्षण 2025 या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणपती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेचा व सुप्त कलागुणांचा आविष्कार घडवत शाडूच्या मातीपासून आकर्षक व सुंदर गणेशमूर्ती साकारल्या.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवून समाजाला संदेश दिला की गणेशोत्सव हरित व प्रदूषणमुक्त पद्धतीने साजरा करणे हीच खरी श्रद्धा आहे. विद्यार्थ्यांनी यावेळी संकल्प केला की यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीनेच साजरा केला जाईल.
जिल्हा परिषद शाळा, घुग्घुस येथे पार पडलेल्या या कार्यशाळेला विद्यार्थी, पालक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आयोजकांनीही विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे व पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
हा उपक्रम मुलांमध्ये पर्यावरण-जागरूकता वाढविणारा ठरून भावी पिढीसाठी हरित समाजनिर्मितीचा संदेश देणारा ठरत आहे.