कोरपना तालुक्यात युरिया खताच्या तीव्र तुटवड्यावरून तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
तहसीलदारांना सादर केले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात युरिया खताच्या तीव्र तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावरून तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तहसीलदार पल्लवी आखरे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात तात्काळ युरिया खताचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली असून, महाराष्ट्र सरकार आणि कृषी मंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या व्यथेची दखल घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
कोरपना तालुक्यात सध्या युरिया खताची मोठी कमतरता जाणवत असून, एक टनही उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. सध्या कापूस आणि इतर पिकांना युरिया खताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. खरीप हंगामाच्या मध्यावर असताना या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. निवेदनात म्हटले आहे की, “शेतकऱ्यांची व्यथा महाराष्ट्र सरकार आणि माननीय कृषी मंत्र्यांना सांगावी व युरिया खताचा तात्काळ पुरवठा करण्यात यावा.” याशिवाय, कोरपना तालुक्यात युरिया खताचा बफर स्टॉक किती आहे आणि तो कुठे साठवलेला आहे, याची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम पेचे यांनी सांगितले की, “शेतकरी हा देशाचा कणा आहे. मात्र, खतांच्या तुटवड्यामुळे त्यांना आर्थिक आणि उत्पादनाच्या संकटात ढकलले जात आहे. सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून पुरवठा सुनिश्चित करावा.” त्यांनी पुढे म्हटले की, या तुटवड्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून, इतर पिकांच्या वाढीवरही परिणाम होत आहे. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहून या मुद्द्यावर आवाज उठवत राहील.
निवेदन सादर करण्याच्या कार्यक्रमात तालुका काँग्रेस कमिटीचे प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक नेते उपस्थित होते. यात श्री उत्तम पेचे (अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी कोरपना), श्री श्याम रणदिवे (माजी सभापती, पंचायत समिती कोरपना), श्री संभाजी कोवे (माजी उपसभापती, पंचायत समिती कोरपना), श्री भाऊराव चव्हाण (उपाध्यक्ष, खरेदी विक्री सहकारी संस्था कोरपना), श्री यादव दरने (माजी उपसरपंच), श्री घनश्याम नांदेकर (माजी सरपंच), श्री शंकर पेचे (माजी सरपंच), श्री विलास आडे (माजी सरपंच), श्री अनिल गोंडे (माजी उपसरपंच), रोशन मरापे (सरपंच) आणि इतर मान्यवरांचा समावेश होता.